खारघर वसाहतीत धुळवड जोरात
खारघर : खारघर आणि तळोजावासियांनी मुक्तपणे धुळवड साजरी केली. बहुतांश सोसायटीत लावण्यात आलेल्या साऊंड सिस्टीमच्या तालावर तरुणाई थिरकत असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. बच्चे कंपनी मात्र धुळवडीत रंगून गेले होते.
होळी रे होळी पुरणाची पोळी असे म्हणत खारघर वसाहतीत १३ मार्च रोजी सगळीकडे होळीचा सण उत्साहात साजरा झाला. गांव, वसाहतीत उत्साहाच्या वातावरणात होळी पेटविण्यात आली. खारघर गावात माजी नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून पारंपरिक होळी साजरी करण्यात आली. यावेळी महिलांसाठी पैठणीच्या खेळात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. १४ मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी बुरा ना मानो होली है, म्हणत एकमेकांना रंग लावत धुळवड उत्साहाने साजरी केली गेली. बहुतांश सोसायटीमध्ये स्पीकर आणि डॉल्बीच्या तालावर मुले, महिला मनसोक्त रंगपंचमी खेळताना दिसून आल्या.
काही सोसायटीने लहान मुलांसाठी पाण्याचे नळ मोकळे सोडले होते. खारघर, सेक्टर-१२ मधील गिरीजा वेल्फेअर या अनाथालयातील मुले गाण्याचा तालावर खेळण्यात दंग झाले होते. खारघर परिसरात नवरंग, बँक ऑफ इंडिया, शिल्प चौक, डेली बझार आदि चौकात रस्त्या-रस्त्यावर रंग विक्रेते दिसून आले. मात्र, ग्राहकांनी पाठ फिरवल्याने खरेदी केलेला खर्च वसूल झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून खारघर पोलिसांनी विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
बंजारा समाजाचे वर्तुळाकर नृत्य...
होळी सण बंजारा समाजासाठी महत्वाचा सण आहे. खारघर आणि तळोजा फेज-२ वसाहतीत बंजारा समाज बांधव एकत्र येवून लेंगी गीतांवर स्त्री-पुरुष गोलाकार डफ वाजवत वर्तुळात नाचत होळी साजरी केली. बंजारा समाजाकडून लोककला, रुढी आणि परंपरा आपली संस्कृती जपत अगदी पारंपरिक रंगांरग पध्दतीने खेळून होळी धुळवड साजरी केली.
कामगारांची होळी...
होळी, धुलवड खेळताना दुकानातील साहित्य, वस्तुंची नासधूस होवू नये म्हणून खारघर मधील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे दुकानात काम करणारे तरुण कामगारांनी एकत्र येवून धुळवड खेळून होळी सण साजरा केला. तर दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या आंध्र प्रदेश, खान्देश आणि विदर्भातील कामगार महिला कामाचा व्याप बाजुला ठेऊन नृत्य करताना दिसून आल्या..
अनाथ मुले तसेच चौकात होळी खेळतानाचे फोटो.