दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस सज्ज
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. दिवाळी सणाच्या दिवसांत नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाजारपेठा, मॉल्स तसेच सोसायट्यांमध्ये गर्दी करत असल्याने या काळात घरफोडी, पाकीटमारी, सोनसाखळी चोरी तसेच सायबर फसवणुकीसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वच पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच या कालावधीत विशेष सुरक्षा उपाययोजना राबविण्याबाबत सूचित केले आहेत.
वाढीव गस्त आणि विशेष पथके...
सोन साखळी चोरी (चेन स्नॅचींग), छेडछाड आणि ईव्ह-टीझिंग या सारख्या गुन्ह्यांंना प्रतिबंध घालण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. सणासुदीच्या काळात बाजारपेठा, बँका, एटीएम सेंटर तसेच सोसायट्यांमध्ये वाढीव पोलीस गस्त घालण्यात येणार आहे. गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलीसही नियुक्त करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे महिला सुरक्षेसाठी निर्भया पथक आणि बीट मार्शल्स तैनात करण्यात आले असून गर्दीच्या ठिकाणी महिलांना मदत आणि त्वरित प्रतिसाद मिळावा, यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक विभागात रात्रीच्या गस्तीसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक नियंत्रण...
दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महिला पोलीस कर्मचारीही देखील वाहतूक नियोजनासाठी तैनात ठेवण्यात येणार आहे. नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाने सीसीटीव्ही नेटवर्कद्वारे प्रमुख चौक, बस स्थानके, रेल्वे स्थानके आणि गर्दीची ठिकाणे यावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आकाशात कंदील आणि ड्रोन उडवण्यावर बंदी...
आकाशात उडविण्यात येणाऱ्या कंदीलामुळे आगीचा धोका उद्भवण्याची शक्यता असल्याने तसेच समाजकंटकांकडून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षा आणि संरक्षणाचा उपाय म्हणून दिवाळीमध्ये आकाशात कंदील उडवण्यावर आणि त्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
आवाज प्रदुषणावर नियंत्रण...
दिवाळी साजरी करताना आवाजाची मर्यादा पाळण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. रात्री १० नंतर मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
सायबर गुन्ह्यांवर लक्ष...
दिवाळीच्या खरेदीदरम्यान ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढ होत असते. त्यामुळे नागरिकांनी खोट्या ऑफर्स, ऑनलाईन गिफ्ट कुपन्स, बँक अपडेटचे फसवे कॉल्स किंवा मेसेजेसवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी ११२, वाहतूक हेल्पलाईनसाठी ७७३८३९३८३९, ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईनसाठी १०९० आणि महिला हेल्पलाईनसाठी १०३ असे विविध हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केले आहेत.
दिवाळीच्या काळात आनंद घेत असताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. मोठ्या रवकमेचे दागिने किंवा रोख रक्कम घेऊन बाहेर जाणे टाळावे. आकाशकंदील आणि फटाके फोडताना सुरक्षा नियमांचे पालन करावे. बाहेरगावी जाताना, दरवाजे आणि खिडक्या नीट बंद ठेवाव्यात. समाजातील शांतता, सलोखा आणि सुरक्षितता राखून दिवाळीचा सण साजरा करावा. संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे.
-योगेश गावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त-विशेष शाखा, नवी मुंबई.