कोव्हीडसंदर्भात नागरिकांनी घाबरु नये; काळजी घ्यावी
मुंबई : राज्यात सध्या काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन ‘सार्वजनिक आरोग्य विभाग'मार्फत करण्यात आले आहे.
कोव्हीड विषाणूमुळे होणारा आजार आहे. सद्यस्थितीत कोव्हीडसाठी राज्यात आयएलआय (इन्पलूएंझा सारखा आजार) आणि एसएआरआय (गंभीर तीव्र श्वसन संसर्ग) सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांची कोव्हीडसाठी चाचणी केली जाते. रुग्ण कोव्हीड पॉझीटीव आढळल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. राज्यात सध्या कोव्हीड केसेस तुरळक आहेत.
जानेवारी २०२५ पासून १२,०११ रुग्णांची कोव्हीड चाचणी केली असून त्यापैकी ८७३ पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून आतापर्यंत ३६९ रुग्ण बरे झाले आहेत. ३ जून २०२५ रोजी सक्रिय असलेले रुग्ण ४९४ आहेत.
निदान झालेल्या सर्व रुग्णांत सौम्य स्वरुपाची लक्षणे आहेत. जानेवारी २०२५ पासून आजपर्यंत सहव्याधीने ग्रस्त असलेले ९ आणि इतर १ असे एकूण १० रुग्ण दगावले आहेत. यापैकी एका रुग्णास नेफ्रोटिक सिंड्रोम सह हायपोकॅल्सिमिक सीझर तर दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता. तिसऱ्या रुग्णास ब्रेन स्ट्रोक झाला होता आणि फिट येत होती. चौथ्या रुग्णास डायबेटिक किटोएसिडोसिस आजार तर पाचव्या रुग्णास आयएलडी होता. सहाव्या रुग्णास डायबेटीस आणि २०१४ पासून अर्धांगवायू झालेला होता. सातव्या रुग्णास सीवीअर एआरडीएस विथ डायलेटेड एओटिक रीगर्जिटेशन आजार होता. आठव्या रुग्णास मधुमेह तर नवव्या रुग्णास मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता. इतरमध्ये ४७ वर्षीय महिलेला ताप आणि धाप लागणे अशी लक्षणे होती.
कोव्हीड रुग्णांची तुरळक वाढ फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर इतर राज्यात तसेच काही इतर देशात देखील दिसून येत आहे. पलूसदृश्य आजार आणि एसएआरआय (तीव्र श्वसन दाह असलेले रुग्ण) यांचे आरोग्य विभागामार्फत नियमित सर्वेक्षण सुरू आहे. तसेच तीव्र श्वसनदाह असलेल्या सर्व रुग्णांचे कोव्हीड-१९ या आजारासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. तसेच पलू-सदृश आजार असलेल्या रुग्णांपैकी ५ टक्के रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. सर्व आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आलेले नमुने संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी एनआयव्ही, पुणे आणि बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे तसेच राज्यातील इतर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात.
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका यांच्या स्तरावर कोव्हीड-१९ साथरोग संदर्भात पूर्वतयारीचा आढावा विभागीय स्तरावर घेण्यात येत असून त्यामध्ये सर्व यंत्रणेला रुग्णालये सुसज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर आरटीपीसीआर चाचणी, ऑक्सीजन बेडस्, आयसीयू बेडस्, व्हेंटिलेटर बेडस् आणि ऑक्सिजन उपलब्धतेबाबत सर्व तयारी ठेवण्यासंदर्भात जिल्ह्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, तथापि काळजी घ्यावी, असे ‘आरोग्य विभाग'तर्फे सूचित करण्यात आले आहे.
नागरिकांनी खोकताना आणि शिंकताना रुमालाचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, धाप लागणे, आदि लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयास संपर्क साधून र्मोफत उपचार आणि आवश्यक तपासण्या करुन घ्याव्यात. अशा प्रकारची लक्षणे, इतर आजाराने व्याधीग्रस्त लोकांमध्ये आढळून आल्यास विशेष दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.