तुर्भे परिसरात सामासिक जागेचा व्यवसायासाठी वापर
तुर्भे : एपीएमसी, तुर्भे परिसरात सामासिक जागेचा (मार्जिनल स्पेस) व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असून, याकडे महापालिका अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने सामासिक जागेवर धंदा करणाऱ्या व्यवसायिकांचे चांगलेच फावत आहे.
नवी मुंबई महापालिका तुर्भे विभाग कार्यालय अंतर्गत आशिया खंडातील सर्वात मोठी समजली जाणाऱ्या वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारात पाच मार्केट आहेत. यामुळे एपीएमसी परिसरात दररोज हजारो लोकांची ये-जा असते. याशिवाय एपीएमसी मार्केट परिसरामध्ये माथाडी भवन तसेच अन्य ठिकाणी ‘एपीएमसी'ला पूरक उत्पादनांची किरकोळ आणि होलसेल दुकाने आहेत. या दुकानदारांनी त्यांच्या दुकानाच्या जागेइतकेच दुकानापुढील सामासिक जागेमध्ये पावसाळी शेड टाकले आहे. वास्तविक पाहता या शेडखाली कोणताही व्यापार करण्यास मनाई आहे. केवळ पावसापासून संरक्षण होण्याकरिता पावसाळी शेडचा वापर होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात या शेड खाली दुकानातील साहित्य ठेऊन त्याची विक्री केली जात आहे. १०० पेक्षा अधिक दुकानदारांकडून सामासिक जागेतील शेड खाली साहित्य ठेऊन त्याची विक्री करुन लाखो रुपयांची कमाई केली जात आहे. यापैकी काही दुकाने किराणा माल, स्टेशनरी साहित्य विक्रीची असून, या दुकानाचे मालक दुकानापुढील सामासिक जागा फरसाण विक्रेत्यांना भाड्याने देऊन वरकमाई करत आहेत. याबाबत महापालिका अतिक्रमण विभागाला माहिती असूनही, सामासिक जागेवर धंदा करणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई करण्याचे टाळले जात आहे.
विशेष म्हणजे सामासिक जागा कमी पडते म्हणून की काय अगदी फुटपाथवरही दुकानदारांनी साहित्य ठेऊन पादचाऱ्यांचीही वाट अडवली आहे. सणासुदीच्या काळात एपीएमसी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी असते. त्यामुळे फुटपाथवर चालण्यास जागा नसल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरुन रस्त्यावरुन चालावे लागत आहे.