बनावट स्क्रीनशॉट दाखवून काजू व्यापाऱ्याची ३१ लाखांची फसवणूक

उल्हासनगर : बनावट ट्रान्झॅक्शन स्क्रीनशॉट पाठवून एका व्यापाऱ्याची ३१ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना  समोर आली आहे. या प्रकरणी उल्हासनगरच्या  हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील काजू व्यापारी रमेश रामचंद्र वाडकर यांनी भिवंडीतील पंकज भद्रा नावाच्या व्यक्तीला काजूची ऑर्डर पुरवली होती. ही डिलिव्हरी १५ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५ः३० च्या सुमारास अंबरनाथ तालुक्यातील नेवाळीपाडा येथील एका गाळ्यात उतरवण्यात आली. यामध्ये ३०० डबे काजू तुकडा आणि १४ डबे अख्खा काजू असा एकूण ३,१४० किलो माल होता, ज्याची एकूण किंमत ३१,९९,००० रुपये होती.

आरोपी पंकज भद्रा याने पेमेंट केल्याचे भासवण्यासाठी व्हॉट्‌सॲपवर एक बनावट स्क्रीनशॉट पाठवला. ज्यामध्ये कोटक महिंद्रा बँकेतून फिर्यादीच्या पत्नीच्या बँक ऑफ इंडिया खात्यात पैसे जमा झाल्याचे आणि बनावट यूटीआर (ळऊR) नंबर दिसत होता. मात्र, प्रत्यक्षात खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे वाडकर यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४) आणि ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरेवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई