गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्य महोत्सव - ना. आशिष शेलार

पेण : आपला गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केला असून त्याची रुपरेषा देखील जाहीर केली आहे. यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा करुया, असे आवाहन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केले.

हमरापूर, तांबडशेत पेण येथे गणेश मूर्तीकारांतर्फे ना. आशिष शेलार यांचा सत्कार करण्यात आला.  या कार्यक्रमात  ते बोलत होते. याप्रसंगी खासदार धर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य नीलिमा पाटील यांच्यासह ‘मूर्तिकार संघटना'चे पदाधिकारी, अभय म्हात्रे, कुणाल पाटील, नितीन मोकल, हितेश जाधव, सुनील पाटील, आदि गणेश मूर्तिकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘पीओपी'मुळे  पर्यावरण नावाची भिती दाखवणारे संकट दूर करणे आमचे कर्तव्यच होते. त्यासाठी आम्ही उच्च न्यायालायात लढा दिला आणि प्रदुषण होत नाही, ते पटवून  दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळेच पीओपी नावाचे संकट पूर्णपणे बाजूला करु शकलो याचा आम्हाला आनंद आहे, ना. आशिष शेलार म्हणाले.

सदर निर्णयामुळे राज्यातील लाखो कामगारांचा आयुष्यभराचा रोजगार वाचला. शासन मूर्तिकार बांधवांच्या सोबतीने एकजुटीने लढले आणि जिंकले देखील. तो विजय आपल्या पारंपारिक सणांच्या जपणुकीसाठी खूप महत्त्वाचा होता, असेही ना. शेलार यांनी यावेळी स्पष्ट केले.

खासदार धैर्यशील पाटील म्हणाले, लाखो गणेशमूर्ती कारखानदाराचा व्यवसाय ज्यावर आधारित होता, त्यावर पीओपी नावाचे संकट आले होते. ते संकट दूर केल्याबद्दल सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचा जाहीर सत्कार करणे आद्य कर्त्यव्य आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील १२ गडकिल्यांना जागतिक दर्जा मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

यावेळी आमदार आमदार रवींद्र पाटील, प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलींद पाटील, यांनी तर आभार मूर्तिकार कुणाल पाटील यांनी मानले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

४ दिवसात १३.१६ कोटी जमा