विमानोड्डाणासाठी नवी मुंबई सज्ज

इंडिगो कंपनी आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज यांच्यात करार

नवी मुंबई : सिडको महामंडळ आणि अदानी उद्योग समुहाच्या सहकार्यातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) उभारण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे. या विमानतळावर भारतीत लढाऊ विमानांची तसेच व्यावसायिक विमानाची चाचणी देखील यशस्वी झाली आहे. त्यातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली असून नवी मुंबई विमानतळावरुन जून महिन्यापर्यत पहिले विमान आकाशात झेप घेण्याच्या दृष्टीकोनातून पहिले पाऊल पडले आहे. नवी मुंबईतून पहिले व्यावसायिक उड्डाण ‘इंडिगो'चे विमान करणार आहे. या उड्डाणासंदर्भात इंडिगो कंपनी आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड यांच्यात पहिला करार झाला आहे.

या करारानंतर नवी मुंबई विमानतळ लवकरच विमानोड्डाणासाठी सज्ज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. साधारणतः जून पासून कधीही ‘इंडिगो'ची नवी मुंबई विमानतळावरुन १५ हून अधिक शहरांसाठी दररोज १८ उड्डाणे (३६ एअर ट्राफिक मॅनेजमेंट) सुरु होणार आहेत. नोव्हेंबर २०२५ पर्यंत उड्डाणांची संख्या वाढून ७९ दैनंदिन उड्डाणांपर्यंत (१५८ एटीएम) पोहोचेल. यात १४ आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा देखील समावेश असेल. नोव्हेंबर २०२६ पर्यंत दैनंदिन १४० उड्डाणे होणार असून त्यापैकी ३० आंतरराष्ट्रीय उड्डाणे असतील. त्यामुळे येत्या काळात आणखी काही विमान कंपन्यांसोबत करार होण्याची शक्यता आहे.

पनवेल आणि उरणच्या परिसरात १,१६० हेक्टर क्षेत्रफळावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एक ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारले जात आहे. अदानी एअरपोर्टस होल्डिंग्ज लि. (एएएचएल) यांची उपकंपनी असलेल्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. (एमआयएएल) यांच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) द्वारे विमानतळ बांधले गेले आहे. या कंपनीकडे ७४ टक्के हिस्सा आहे, तर ‘सिडको'कडे २६ टक्के हिस्सा आहे.

‘इंडिगो'च्या माध्यमातून नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरुन पहिली विमानसेवा सुरु होणार आहे. याचा आम्हांला आनंद होत असून प्रवाशांच्या वाढत्या गरजा त्याबरोबरच भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राला इंडिगो आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक गतीमान करणार आहे. नवीन ‘एनएमआयए'च्या नवीन उड्डाणांमुळे प्रवासाचा अनुभव उंचावेल.
-पीटर एल्बर्स, सीईओ-इंडिगो एअरलाईन्स.

‘एनएमआयए'मधून ऑपरेशन सुरु करणारा इंडिगो पहिला एअरलाईन भागीदार होणार आहे. आमच्यातील भागीदारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ट्रान्सफर हब म्हणून ‘नवी मुंबई विमानतळ'चे स्थान निश्चित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. आमचे सहकार्य या प्रदेशासाठी आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवाशांसाठी ‘एनएमआयए'ची विमान वाहतूक प्रवेशद्वार म्हणून भूमिका मजबूत करण्यासाठी सज्ज आहे. ‘इंडिगो'सोबत भागीदारी करीत विमानसेवेसाठी करार करुन यशस्वी पाऊल टाकले आहे. ‘'नवी मुंबई विमानतळ'ला एक प्रमुख विमान वाहतूक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने सदरचा एक महत्वाचा टप्पा गाठला आहे.
-अरुण बन्सल, सीईओ-अदानी एअरपोर्ट होल्डींग्ज लि.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्मार्ट सिटी डोंबिवलीत गटाराचे घाण पाणी रस्त्यावर