खारघरमध्ये पतीने पत्नीची गळा चिरुन केली हत्या
नवी मुंबई : खारघर सेक्टर-34 मधील डॉल्फिन प्राईड सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीची चाकुने गळा चिरुन हत्या केल्यानंतर स्वत:च्या गळ्यावर वार करुन घेत स्वत:चे जीवन संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. खारघर पोलिसांनी या प्रकरणी बीएनएस कलम 103(1) नुसार गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाही सुरु केली आहे. या हत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज पोलिसांकडुन व्यक्त करण्यात येत आहे. हे दोघे पती पत्नी मुळचे पाकिस्तानी असून ते लाँग टर्म विझीट विझा मिळवून भारतात आले होते.
या घटनेतील मृत महिलेचे नाव नूतन दास (35) तर तिच्या पतीचे नाव नोतनदास उर्फ संजय सचदेव (46) असे आहे. हे दोघेही मुळचे पाकीस्तानी असून गत नोव्हेंबर महिन्यामध्ये ते आपल्या दोन मुलांसह लाँग टर्म व्हिजिट विझा मिळवून भारतात आले होते. मागील सहा महिन्यापासून ते खारघर सेक्टर-34 मधील डॉल्फिन प्राइड सोसायटीत भाडेतत्त्वावर वास्तव्यास होते. सोमवारी सकाळी त्यांची मुले शाळेत गेले होते. यादरम्यान घरामध्ये या पती पत्नीमध्ये भांडण झाले. या भांडणामध्ये नोतनदास याने स्वंयपाक घरातील चाकुने पत्नी सपना हिच्या गळ्यावर, पाठीवर, खांद्यावर वार करुन तिची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:च्या गळ्यावर देखील वार करुन घेत स्वत:चे जीवन संपवले.
सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांची मुले शाळेतून घरी पोहोचल्यांनतर आई वडील आवाज दिल्यांनतर देखील दरवाजा उघडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने खारघर सेक्टर-6 मध्ये राहणाऱया संगीता सेवक माखीजा (46) या मृत सपना दास यांच्या बहिणीला संपर्क साधला. त्यानंतर संगीता मखीजा हिने डॉल्फिन प्राईड सोसायटीत धाव घेऊन पहाणी केली असता, हत्येचा हा प्रकार उघडकीस आला. खारघर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी रात्री उशीरा या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला.
या घटनेतील मृत सपना दास हिला आपल्या मुळ गावी जायचे होते, मात्र तिचा पती नोतन दास याचा त्यासाठी विरोध होता. यावरुन दोघा पती पत्नीमध्ये नेहमी वाद व भांडण होते होते. नोतन हा रागीट असल्याने त्याला तत्काळ राग येत होता. सोमवारी सकाळी देखील या दोघांमध्ये त्याच कारणावरुन भांडण झाले असावे, तसेच या भांडणानंतर हे कृत्य घडल्याचा अंदाज पोलिसांकडुन व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांकडुन पुढील तपास करण्यात येत आहे.