३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्या

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन २०२४-२५ या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर एकूण ५२७ इमारती महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २६४ पोटकलम (१) (२) (३) (४) अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २६५(अ) नुसार ज्या इमारतींचा वापर सुरु होऊन ३० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींचे नवी मुंबई महापालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकडून संरचना परीक्षण  (Structural Audit) करुन घेणे अनिवार्य आहे.

३० वर्षापेक्षा जास्त काळ इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशतः) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून मोजावयाचा आहे. नेमलेल्या संरचना अभियंत्याने शिफारशी केलेली दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याचे आणि ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई महापालिकाकडे सादर करावे. या प्रकारे संरचना परीक्षण करण्याचे उत्तरदायित्व जी संस्था, माल्क, भोगवटादार पार पाडण्यास टाळाटाळ करतील त्यांना २५ हजार रुपये अथवा सदर मिळकतीच्या वार्षिक मालमत्ता कराची रक्कम यातील जी जास्त असेल तितक्या रक्कमेचा दंड ठोठवावयाची तरतूद महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ३९८ (अ) खाली अंतर्भूत करण्यात आलेली आहे.

नवी मुंबई महापालिकेने संरचनात्मक परीक्षक (स्ट्रक्चरल इंजिनियर) यांची यादी ‘नमुंमपा'च्या www.nmmc.gov.in  संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेली आहे. ३० वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी पूर्ण करुन याबाबतचा अहवाल संबधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी किंवा सहाय्यक संचालक नगररचना यांच्याकडे सादर करावयाचा आहे.

धोकादायक झालेल्या इमारतींचा, घरांचा वापर करणे जिकरीचे आहे. त्यामुळे जीवित आणि वित्त हानी होऊ शकते म्हणून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा, घराचा रहिवास, वापर तात्काळ थांबविण्यात यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा दुर्दैवी अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधितांची राहील याची नोंद  घेण्यात यावा, असे सूचित करण्यात येत आहे.

-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पर्यावरण दिनी सानपाडा मध्ये वृक्षारोपण, शिववृक्ष रोपे-कापडी पिशवी वाटप