छत्रपतींच्या पुतळ्याजवळ ‘सीसीटिव्ही'साठी निविदा प्रक्रिया सुरु
भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील घोडबंदर प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सीसीटिव्ही कॅमेरे तसेच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावेत याबाबतचे सविस्तर वृत्त ‘आपलं नवे शहर'मध्ये ६ ऑगस्ट रोजीच्या अंकात छत्रपतींच्या पुतळ्या जवळ कॅमेऱ्याची मागणी या मथळ्याखाली प्रसिध्द झाले होते. या वृत्ताची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेऊन सदर कामासाठी निविदा प्रक्रिया सुरु केली असल्याचे पत्राद्वारे कळविले आले.
मिरा-रोडच्या घोडबंदर भागातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सगनाई देवी मंदिराजवळ ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झ धातुचा, ५० फुट उंच पुतळा महापालिकेने ३ कोटी रुपये खर्च करुन उभारला आहे. महाराजांच्या पुतळ्याची सुरक्षा चोख राखण्यासाठी सदर ठिकाणी सुरक्षिततेचा उपाय म्हणून सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. तसेच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावेत, अशी मागणी ‘संग्राम सामाजिक संस्था'चे अध्यक्ष श्रीनिवास निकम यांनी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना पत्र लिहून केली होती.
याबाबतचे वृत्त ‘आपलं नवे शहर'मध्ये वृत्त प्रसिध्द होताच प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत श्रीनिवास निकम यांना महत्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु केली असल्याचे पत्र दिले आहे.