‘बाजार समिती'च्या निवडणुकीत ‘महायुती'चा वरचष्मा
कल्याण : ‘कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती'च्या र्सावत्रिक निवडणुकीत ‘बाजार समिती'वर ‘महायुती'चा झेंडा फडकला आहे. ‘बाजार समिती'च्या एकूण १८ जागांपैकी १५ जागा ‘महायुती'च्या कोट्यात पडल्या असून २ जागांवर महाविकास आघाडी तर एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली आहे. त्यामुळे ‘कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिता'वर मतदारांनी ‘महायुती'ला एकहाती सत्ता देऊन आपला विश्वास दाखविला.
‘कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती'च्या निवडणुकीचा निकाल २८ जून रोजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. निवडणुकीत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला मतदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला. २८ जून रोजी सकाळी ७ वाजता मतदानासाठी मोठी गर्दी केली होती. तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण मतदानाच्या ९०.३७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. ‘कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती'मध्ये २३५८ मतदारांपैकी तब्बल २१३१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, यामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता.
‘कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती'च्या १८ जागांपैकी एकूण १७ जागांसाठी मतदान झाले असून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला. ‘बाजार समिती'च्या निवडणुकीत १५५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी १५ अर्ज बाद असून प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात ५१ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते.
या निवडणुकीमध्ये रवींद्र घोडविंदे, कपिल थळे, भरत गोंधळे, योगेश धुमाळ, अरुण पाटील, जालिंदर पाटील, मनोहर पाटील, विद्या पाटील, शारदा पाटील, वसंत लोणे, रवींद्र आव्हाड, नरेश सुरोशी, रवींद्र भोईर, किशोर वाडेकर, विजय सुरोशी, काशिनाथ नरवडे आणि गिरीश पाटील यांनी विजयश्री मिळवली असून हमाल आणि तोलाई गटातील शंकर आव्हाड बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधवर यांनी दिली.