उलवेमधील विवाहितेची पतीनेच सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे उघड
फरार मारेक-याचा पोलिसांकडुन शोध सुरु
नवी मुंबई : उलवेमध्ये गत रविवारी रात्री अलवीना किशोरसिंग उर्फ अलवीना अदमली खान (27) या विवाहितेची तिच्याच पतीनेचे सुपारी देऊन तिची हत्या घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने तपास करत मृत विवाहितेचा पती किशोरसिंग राजपुत तसेच हत्येची सुपारी घेणारी महिला अलिशा त्यागी व तिची सहकारी डिंपल या तिघांना अटक केली आहे. मात्र ज्या मारेक-याने अलवीना हिची हत्या केली, तो मारेकरी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या घटनेतील मृत अलवीना अदमली खान ही पती किशोरसिंग राजपूत याच्यासोबत उलवे सेक्टर-5 मधील विजय लक्ष्मी टॉवरमध्ये राहत होती. अलवीना व तिचा पती किशोरसिंग हे दोघेही त्याच परिसरात मेडीकल शॉप चालवत होते. रविवारी दुपारी अलवीना ही मुंबईतील आपल्या नातेवाईकांकडे गेली होती. तेथून ती रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास उलवे येथील घरी परतत असताना तिच्या घरापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर अज्ञात मारेक-याने तिला गाठून तिच्या गळ्यावर धारधार चाकुने वार करून पलायन केले होते. यात अलवीनाचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर उलवे पोलिसांनी अज्ञात मारेक-या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती.
गुन्हे शाखा युनिट-2 कडुन सुद्धा या प्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत होता, गुन्हे शाखेने केलेल्या तपासात मृत अलवीना व तिचा पती किशोरसिंग या दोघांमध्ये मागील काही वर्षापासून आर्थिक देवाणघेवाणीतुन वाद सुरु असल्याचे तसेच दोघेही घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने संशयावरुन किशोरसिंग याची उलटतपासणी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर पोलिसांनी त्याची कसुन चौकशी केल्यानंतर त्यानेच सुपारी देऊन अलवीनाची हत्या घडवून आणल्याची कबुली दिली.
घटस्फोट देत नसल्यामुळे केली हत्या
अलवीना हिने किशोरसिंगला व्यवसायासाठी 15 लाख रुपये दिले होते, सदर पैसे ती किशोरसिंग याच्याकडे मागत होती. त्यातच अलवीनाचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबध जुळल्याने किशोरसिंग याने अलवीनाकडे घटस्फोटाची मागणी केली होती. मात्र पैसे दिल्याशिवाय घटस्फोट देणार नसल्याचे तीने किशोरसिंगला बजावले होते. त्यामुळे या दोघांमध्ये गेल्या काही वर्षापासून वाद सुरु होता. 15 लाख रुपये दिल्यानंतर देखील अलवीना घटस्फोट देणार नसल्याची भीती किशोरसिंग याला होती. त्यामुळेच त्याने सुपारी देऊन अलवीनाची हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
7 लाखाची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे उघड
पोलिसांनी केलेल्या तपासात किशोर सिंग याने अलवीनाची हत्या घडवून आणण्यासाठी उलवेत राहणा-या अलिशा त्यागी या महिलेला 7 लाखांची सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील 5 लाख रुपये त्याने दिले होते, हत्या झाल्यानंतर उर्वरीत 2 लाख रुपये देण्याचा त्यांच्यामध्ये व्यवहार ठरला होता. त्यानुसार अलिशा त्यागी हिने तिची सहकारी डिंपल हिच्या ओळखीतून पंजाब येथून एका मारेक-याला बोलावून घेतले होते. त्यानेच गत रविवारी रात्री अलवीनावर पाळत ठेवून तिची भररस्त्यात गळा चिरुन हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी किशोरसिंग राजपुत, अलिशा त्यागी व डिंपल या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी फरार मारेक-याचा शोध सुरु केला आहे.