सिडको तर्फे खारघर मध्ये सेवानिवृत्त कर्मचारी वर्गासाठी ‘स्पोर्ट क्लब' उभारणी
खारघर : सिडको व्यवस्थपनातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सिडको तर्फे खारघर मध्ये स्पोर्ट क्लब उभारण्यात येणार आहे. स्पोर्ट क्लब करिता सिडको द्वारे जागेची निवड करण्यात आली असून, स्पोर्ट क्लब बांधकामासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे.
मुंबई शहरातील लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने १९७० साली ‘सिडको'ची (शहर औद्योगिक विकास मंडळ) स्थापना केली. सिडको अस्तित्वात येवून जवळपास पंचावन्न वर्षे झाली आहेत. या ५५ वर्षात सिडको मधील अनेक कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. सिडको मध्ये अनेक वर्षे सेवा केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे आरोग्य तसेच त्यांच्यात सामाजिक बांधिलकी असावी, त्यांना विविध खेळ खेळता यावेत, यासाठी सिडको तर्फे खारघर सेक्टर-५ मधील भूखंड क्रमांक-४६अ मध्ये स्पोर्ट क्लब उभारण्यात येणार आहे. या क्लब मध्ये व्हॉलीबॉल, टेनिस यांसह विविध खेळांसाठी जागा तसेच तरण तलाव (स्विमिंग पूल) असणार आहे. या क्लब मार्फत सिडकोमध्ये अनेक वर्षे सेवा केलेले कर्मचारी एकत्र येणार असल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी समाधान व्यक्त करीत आहेत. स्पोर्ट क्लब उभारण्यासाठी सिडको जवळपास ४०कोटी पेक्षा अधिक रवकम खर्च करणार आहे.
‘सिडको' तर्फे खारघर सेक्टर-५ मधील भूखंड क्रमांक- ४६ अ उद्यानासाठी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र, सदर भूखंड नागरी वसाहत पासून दूर असल्याने या भूखंडाची स्पोर्ट क्लब उभारण्यासाठी निवड करण्यात आली आहे.