२७ गावातील कामगारांना १५ ऑगस्ट रोजी नियुक्तीपत्र
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावातील कामगार मागील १० वर्षापासून महापालिकेच्या सेवेत कार्यरत असून या कामगारांना कायम करण्याबाबत राज्य शासनाने आदेशित केले आहे. मात्र, तरीही या कामगारांची प्रतिक्षा कायम असून प्रशासनाकडून कामगारांची पोलीस पडताळणी आणि आरोग्य तपासणी पूर्ण होताच या कामगारांना टप्प्याटप्प्याने नियुक्ती पत्र दिली जातील. पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्र १५ ऑगस्ट रोजी देणार असल्याचे आश्वासन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आमदार राजेश मोरे यांना दिले. आमदार मोरे यांनी विविध विषयावर महापालिका आयुक्तांची भेट घेत सकारात्मक चर्चा केली.
ग्रामीण भागात दळण-वळणाच्या सुविधा नसल्याने विद्यार्थ्याचे हाल होत असून या गावातून शाळेच्या वेळामध्ये बस सुविधा सुरु करण्याची मागणी मान्य करत कामगार आणि बसेस कमी असल्या तरीही काही प्रमाणात या मार्गावर बसेस चालविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. तर ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्या बरोबरच स्मार्ट सिटी मधील बंद असलेले कॅमेरे सुरु करावेत, गावामध्ये पथदिवे बसवावेत. हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने, आणि हेल्थ सेंटर सुरु करावेत, सणाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत. मंडपांसह कमानी शुल्क देखील माफ करावे, ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अमृतच्या जलकुंभाचे काम पूर्ण करत या जलकुंभातून पाणी पुरवठा सुरु करावा, ग्रामीण भागातील भूयारी गटारांची कामे सुरु करावीत, डोंबिवली स्थानक परिसरातील चिमणी गल्लीतील पार्किंग तातडीने सुरु करण्याची मागणी आमदार मोरे यांनी यावेळी केली.
दरम्यान, याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त गोयल यांनी आमदार मोरे यांना दिले. त्याचबरोबर पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘एमआयडीसी'च्या अधिकाऱ्याबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. यावेळी डोंबिवली शहर सचिव विधानसभाक्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण, उप तालुकाप्रमुख राहुल गणपुले, उपशहरप्रमुख संजय विचारे, दत्ता वझे, गजानन मांगळूरकर, आदि उपस्थित होते.