मृत्युनंतरही यातना संपेना!
ठाणेः शहापूर तालुक्यातील उंबरमळी या गावात आजही मुलभूत सुविधांचा अभाव आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७८ वर्षे पूर्ण झाली असली तरी या गावातील कातकरी आदिवासी समाजाला मरणानंतर देखील सन्मानाने अंत्यसंस्कार करता येत नाहीत. उंबरमाळी गावात स्मशानभूमीच नसल्याने उघड्यावर शव जाळावे लागतात.
गावात मासनभूमीच नाही, त्यामुळे मृतदेह जाळण्यासाठी ठराविक जागा उपलब्ध नाही. कुठेही मोकळ्या जागेवर अंत्यसंस्कार करावे लागतात. एवढेच नव्हे तर जेथे जाळण्याची सोय आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे मृतदेह खांद्यावरुन उचलून नेण्याची वेळ येते. पावसाळ्यात तर सदर परिस्थिती आणखी गंभीर होते. चिखलातून, ओढे-नाल्यांमधून मृतदेह नेणे म्हणजे कुटुंबियांच्या दुःखात भरच पडते.
आजही कातकरी समाज अत्यंत मागासलेला असून शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि निवारा या मुलभूत गरजांपासून ते वंचित आहेत. शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ या समाजापर्यंत पोहोचत नाही. देशाच्या स्वातंत्र्यानंतर विकासाच्या अनेक घोषणा झाल्या; परंतु उंबरमळीतील वास्तव त्याच्या अगदी उलट आहे. मृत व्यक्तीसाठी अंत्यसंस्काराची सोय आणि त्यासाठी रस्त्याची सुविधा असा मुलभूत अधिकार आहे. शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या गावाला स्मशानभूमी आणि रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
दरम्यान, उंबरमळी गावातील मुकुंद लक्ष्मण वाघ (७५) यांचे २२ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या मृतदेहाला पावसात उघड्यावर अग्नि देण्यात आला.