‘महाविकास आघाडी'च्या पदाधिकाऱ्यांविरुध्द गुन्हे

बदलापूर : टीओडी वीज मीटर विरोधात आंदोलन करणाऱ्या बदलापूर मधील ‘महाविकास आघाडी'च्या पदाधिकाऱ्यांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आंदोलनानंतर ‘महावितरण'च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आंदोलकांची मागणी मान्य करत सक्तीने आणि संमतीशिवाय मीटर बदलले जाणार नाही, असे लेखी आश्वासन दिले आहे.

राज्यभरात ‘महावितरण'तर्फे टीओडी अर्थात टाईम ऑफ डे या तत्वावर आधारीत मीटर घरगुती ग्राहकांकडे बसवले जात आहेत. कल्याण परिमंडळ मध्ये सव्वा दोन लाखांहून अधिक मीटर बदलून नविन मीटर लावण्यात आले आहेत. तर बदलापूर विभागातही सुमारे ४३ हजार मीटर बदलण्यात आले आहेत. मात्र, या मीटरमुळे अवास्तव बिले आल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली आहे. सोबतच मीटर बदलताना ग्राहकांची कोणतीही संमती तसेच संबंधित गृहसंकुलांना विश्वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे २ जून रोजी ‘महाविकास आघाडी'तील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस तसेच घटक पक्षांच्या वतीने बदलापूर पूर्वेतील खरवई महावितरण कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी आंदोलकांनी महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गौतम अदानी यांचे फोटो असलेले तोरण बांधले होते. तसेच येथील कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांची खुर्ची बाहेर आणून त्यावर गौतम अदानी यांचा फोटो लावत आंदोलन केले होते. या प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या वतीने दिलेल्या तक्रारीनंतर सदर सर्व आंदोलकांविरुध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप ठेवत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अविनाश देशमुख, हेमंत रुमणे, संजय जाधव, किशोर पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी आणि ४० हून अधिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. शासकीय कामात अडथळा, वीज ग्राहकांना कामात अडथळा, २ तास कामकाज बंद पाडणे, असे आरोप आंदोलकांवर ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, आदोलकांनी केलेल्या मागण्यांवर बोलताना ‘महावितरण'चे कार्यकारी अभियंता यांनी आंदोलकांचे म्हणणे समजून घेतले. ग्राहकांना विचारल्याशिवाय मीटर बदलले जात असल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच यापुढे संमतीशिवाय कोणतेही मीटर बदलले जाणार नाही, असे लेखी आश्वासनही दिले. मग, त्यानतंरही आंदोलकांवर गुन्हे का? असा प्रश्न आता आंदोलकांनी उपस्थित केला आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर कामगार मंत्र्यांना साकडे