बळीराजाकडून भात कापणीला सुरुवात
पनवेल : पनवेल परिसरातील शेतजमिनीवर यंदा भात पिक कापणी योग्य तयार झाले असून कापणीला सुरुवात झाली आहे. या कापणीतून हजारो हातांना आता महिनाभर काम मिळणार आहे. विशेष म्हणजे आदिवासी वाड्यांमधील महिला आणि पुरुषांना रोजगाराचे दालन खुले झाले आहे.
वाढत्या औद्योगिकीरणासह उत्पादन कमी येत असल्याने भातशेतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भात पिकांचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी या नकारात्मक विचारामुळे अनेकांनी शेती करण्याकडे दुर्लक्ष करुन मुंबई, पुणेकडे नोकरी करण्यावर भर दिला आहे. तर काही ठिकाणी औद्योगिकीकरणामुळे जमीन संपादन प्रक्रिया वाढू लागली आहे. अनेकांच्या पिकत्या जमिनी प्रकल्पासाठी खरेदी करण्यात आल्या असून काही ठिकाणी त्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतीचे क्षेत्र घटले आहे. १० वर्षांपूर्वी १ लाख २४ हजार हेक्टर क्षेत्र होते. मात्र, २ वर्षांपूर्वी हेच क्षेत्र ९४ हजार हेक्टर इतके होते. यावर्षी या क्षेत्रात १० हजार हेक्टरने घट झाली आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यामध्ये ८४ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भात पिकांची लागवड करण्यात आली होती. त्यात कोलम, सुवर्णा, रत्ना अशा अनेक पिकांना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. आता पावसाचा हंगाम संपला असून भात शेती बहरु लागली आहे. कापणीयोग्य पिक झाल्याने शेतकऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून कापणीला सुरुवात केली आहे.
दुपारी ऊन लागत असल्याने पहाटे पासूनच भात कापणीला सुरुवात केली जात आहे. शेतकरी कापणीच्या कामाला लागला आहे. दिवाळी सणापूर्वी ३० टक्केहून अधिक क्षेत्रातील भात कापणी पूर्ण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भात कापणीतून ग्रामीण भागातील विशेष म्हणजे आदिवासी वाड्यांमधील महिला आणि पुरुषांना रोजगाराचे साधन खुले झाले आहे. ३०० रुपयांपासून कामगारांना मजुरी दिली जात आहे. महिनाभर सदर प्रक्रिया सुरु राहणार असल्याने अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे.