ई-टॉयलेटसाठी बोअरवेल द्वारे २४ तास पाणी

खारघर : पनवेल महापालिकेने खारघर मधील उद्यान आणि मैदानात उभारलेल्या ई-टॉयलेट तसेच कंटेनर टॉयलेट मध्ये २४ तास पाणी पुरवठा व्हावे यासाठी बोअरवेलद्वारे पाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

‘सिडको'ने खारघर शहर उभारले; मात्र शहरात वर्दळीच्या ठिकाणी एकही स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करुन दिली नाही. दरम्यान, पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यावर महापालिकेने स्वच्छता अभियान अंतर्गत बीपीसीएल कंपनीच्या सीएसआर निधीतून मैदान आणि उद्यानात नागरिकांसाठी ई-टॉयलेट उभारले आहे. महापालिकेकडून सकाळ-संध्याकाळ ई-टॉयलेट छतावर प्लास्टिक टाकी जोडणी आणि त्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, टाकीतील पाण्याची क्षमता कमी असल्यामुळे पुरेसा पाणी प्राप्त होत नाही. त्यामुळे ई-टॉयलेट मध्ये २४ तास पाणी उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेकडून टॉयलेट असलेल्या उद्यान आणि मैदानात बोअर वेलद्वारे पाणी उपलब्ध करुन दिले जात असल्यामुळे रहिवासी समाधान व्यक्त करीत आहेत.

खारघर, सेक्टर-१२ मधील गांवदेवी मैदानालगत कामगार नाका आहे. सकाळच्या वेळी कामाच्या शोधात मोठ्या प्रमाणात असतात. त्यांची गैरसोय होत असे, तसेच मैदानात विविध खेळ खेळण्यासाठी मुलांची गर्दी असते. मैदानाच्या बाजुला महापालिकेने उभारलेल्या  ई-टॉयलेट मध्ये पाण्याची कमरता होती. महापालिकेकडे पाठपुरावा करुन टॉयलेट मध्ये २४ तास पाणी उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.
-हर्षदा उपाध्याय, माजी नगरसेविका.

खारघर मधील सर्व ई-टॉयलेट मध्ये नियमितपणे पाणी उपलब्ध व्हावे, तसेच उद्यानात पाण्याचा उपयोग करता येईल असा उद्देश समोर ठेवून खारघर परिसरात ज्या ठिकाणी ई-टॉयलेट आहे, त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून बोअरवेल उपलब्ध करुन दिले जात आहे.
-डॉ. वैभव विधाते, उपायुक्त-पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 वाशी येथे मॉक ड्रिल उत्साहात संपन्न