रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदाराला बिल अदा

उल्हासनगर : शहरातील गुलराज टॉवर ते वडोलगाव रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच महापालिकेने ठेकेदाराला १ कोटी रुपयांचे बिल अदा केले आहे. त्यामुळे महापालिका शहर अभियंता संदीप जाधव यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी पॅनल १२ च्या माजी नगरसेविका सविता तोरणे, गजानन शेळके, समाजसेवक शिवाजी रगडे, फिरोज खान यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. माजी नगरसेवक महादेव सोनवणे, भगवान मोहिते, दशरथ चौधरी, रामेश्वर गवई यांच्या हस्ते २८ मे रोजी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.

उल्हासनगर कॅप-३ येथील पॅनल क्र.१२ गुलराज टॉवर ते वडोलगाव पुलापर्यंत रस्ता अद्यापही पूर्णपणे बनलेला नाही. तरी देखील सदर रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वींच शहर अभियंता जाधव यांनी ‘जय भारत कन्स्ट्रक्शन'चे व्यवस्थापक केशव यांना १ कोटीचे बिल दिल्याचा आरोप ‘राष्ट्रवादी'चे प्रवक्ते शिवाजी रगडे यांनी केला आहे. तसेच सदर रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरु न झाल्याने २८ मे पासून पॅनल क्र.१२च्या माजी नगरसेविका सविता तोरणे रगडे, माजी नगरसेवक गजानन शेळके, शिवाजी रगडे, फिरोज खान, सुमन शेळके, शालिनीताई गायकवाड, रवींद्र केणे, गजानन म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, शरद म्हात्रे, रेखा जाधव, सचिन म्हात्रे, विनोद म्हात्रे, सागर म्हात्रे या समस्त ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देणारे निवेदन उल्हासनगर महापालिका आयुक्तांना दिले होते. मात्र, सदर रस्त्याचे काम अद्यापही सुरु केले नसल्याने २८ मे पासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.  

दरम्यान, सदर निवेदनाची दखल घेत आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश देखील दिले होते. परंतु, शहर अभियंता संदीप जाधव यांनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून त्या रस्त्याचे काम सुरु केले नाही. त्यामुळे आम्हाला उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागला, असे शिवाजी रगडे यांनी सांगितले.

सदर उपोषण आंदोलनाला सर्व पक्षानी पाठिंबा दिला असून प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरु होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार आही, असा निर्धार या उपोषणकर्त्यांनी केला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे नाला ओव्हरफ्लो