गणेशोत्सव आडून नामांकित कंपन्याद्वारे फुकटात जाहिरातबाजी
तुर्भे : गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून नवी मुंबई शहरातील बिल्डर आणि नामांकित कंपन्याद्वारे त्यांच्या उत्पादनांची संपूर्ण नवी मुंबई शहरांमध्ये फुकटात जाहिरातबाजी करण्यात आली आहे. यामुळे एकीकडे नवी मुंबई शहर विद्रूपीकरणात भर पडत असून, दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेच्या लाखो रुपयांच्या महसूलाला फटका बसला आहे. मात्र् महापालिका अधिकाऱ्यांना याचे काही देणे-घेणे पडले नसल्याचे चित्र दिसत आहे.
सीबीडी-बेलापूर, दिवाळे गाव, आग्रोळी गाव, नेरुळ मधील अक्षर चौक, गायमुख चौक, वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर, अरेंजा सर्कल, वाशी डेपो, वाशी सेक्टर-१७, सेक्टर-१, सेक्टर-१५/१६, कोपरखैरणे मधील गुलाबसन्स डेअरी, कोपरखैरणे डी मार्ट, ऐरोली सेक्टर-५ चौक, घणसोली यासह सर्वच ठिकाणी गल्लोगल्ली श्रीगणेशोत्सव मंडळाच्या लगत विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देणारे अनधिकृत जाहिरात फलक लावले आहेत. याशिवाय काही श्रीगणेशोत्सव मंडळांनी एखाद्या दुसऱ्या कमानीची परवानगी घेऊन अतिरिक्त कमानी लावल्या आहेत. त्याचबरोबर मोठ्या श्रीगणेशोत्सव मंडळांनी खाजगी कंपन्यांच्या लाखो रुपयांच्या देणगीच्या पावत्या फाडून त्यांचे जाहिरात फलक श्रीमूर्ती मंडप सभोवतालच्या परिसरामध्ये लावले आहेत. नामांकित कंपन्याद्वारे गणेशोत्सव मंडळांना देणग्या देताना त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती संपूर्ण नवी मुंबई शहरांमध्ये एकसारख्याच दिसाव्यात याचीही काळजी घेण्यात येत आहे. यासाठी संबंधित कंपन्यांकडून जाहिरात फलक श्रीगणेशोत्सव मंडळांना पुरविले जातात. या मंडळांनी मोक्याच्या ठिकाणी जाहिराती दिसतील अशाप्रकारे लावण्याचे बंधन घालण्यात येत असल्याने संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून नवी मुंबई शहरातील बिल्डर लॉबी आणि नामांकित कंपन्या यांनी फुकटात जाहिरातबाजी केली आहे. जाहिरातींद्वारे महापालिकेच्या तिजोरीमध्ये प्रतिवर्षी लाखो रुपयांचा महसूल जमा होत असतो. मात्र, सण उत्सवांच्या आडून फुकटात जाहिरातबाजी केल्याने महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.
या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधितांवर गुन्हे नोंद केल्यास याला आळा बसू शकेल तसेच संबंधित विभाग कार्यालयातील वरिष्ठ लिपिक किंवा अधीक्षक यांनी यावर गुन्हे नोंद करण्याची किंवा दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद असतानाही राजकीय दबावामुळे महापालिका अतिक्रमण विभाग अधिकारी फुकटात जाहिरातबाजीकडे दुर्लक्ष करताना दिसतात. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्यामुळे नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे नवी मुंबई शहरातील सुजाण नागरिकांचे लक्ष लागले आहे.