अंबरनाथ न्यायालयाचे ९ ऑगस्ट रोजी उद्‌घाटन

अंबरनाथ : अंबरनाथच्या न्याय व्यवस्थेत एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर अंबरनाथमध्ये न्यायालय सुरू होणार असून, त्याचे उद्‌घाटन ९ ऑगस्ट रोजी होणार आहे. यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

न्यायाधीश, अधिकाऱ्यांकडून पाहणी...
उद्‌घाटनाच्या तयारीचा भाग म्हणून ४ ऑगस्ट रोजी ठाणे आणि कल्याण जिल्हा न्यायाधीशांनी न्यायालय इमारतीची पाहणी केली. या पथकात न्यायाधीश मोहिते, न्यायाधीश भन्साळी, न्यायाधीश पवार आणि कल्याणचे जिल्हा न्यायाधीश अस्तुरके  यांचा समावेश होता. त्यांनी इमारतीतील सुविधा, सुरक्षा व्यवस्था, मंडप आणि इतर व्यवस्थांचा आढावा घेतला. न्याय प्रक्रिया सुरळीत चालावी यासाठी आवश्यक सूचनाही त्यांनी दिल्या.

वाचणार नागरिकांचा वेळ, पैसा...
अंबरनाथ पूर्व चिखलोली येथे नवीन न्यायालय सुरू होत आहे. यामुळे ‘न्याय आपल्या दारी' या धोरणानुसार, येथील नागरिकांना तातडीने आणि सोयीस्कर न्याय मिळणे शक्य होणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार असून, न्यायव्यवस्था अधिक लोकाभिमुख होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उद्‌घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ‘वकील संघटना'ने केले आहे. 
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रॅपिडो बाईकवर कारवाईची मागणी