सिडको आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित

नवी मुंबई : ‘सिडको'चा आपत्कालीन नियंत्रण कक्ष २६ मे पासून ३० सप्टेंबर २०२५ या पावसाळी कालावधीमध्ये २४/७ तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळी कालावधीमध्ये ‘सिडको'तर्फे नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील नागरिकांकरिता आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येतो. पावसाळा कालावधीमध्ये उद्‌भवणाऱ्या संभाव्य आपत्ती, दुर्घटना लक्षात घेता ‘सिडको'चा सुसज्ज असा आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यरत असतो. २६ मे रोजी ‘सिडको'चे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या तयारीचा आणि या कक्षाच्या माध्यमातून पार पाडल्या जाणाऱ्या सर्व सेवा-सुविधांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे सर्व संबंधित नोडल अधिकाऱ्यांना नागरिकांच्या मॉन्सून संबंधित तक्रारींचे वेगाने निराकरण करण्याचे आदेश दिले.

सीबीडी-बेलापूर येथील सिडको भवन इमारतीच्या तळमजल्यावर असलेला सदर नियंत्रण कक्ष कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसहित शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही २४ तास कार्यरत राहणार आहे. या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, उद्यान विभाग, आदि महत्त्वाच्या विभागाचे कर्मचारी २४ तास संपर्कात असतील.

‘सिडको'च्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाद्वारे वृक्षांची पडझड, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी, रस्त्यावरील उघड्या गटारांची झाकणे पूर्ववत बसवणे, पूर-पूरसदृश परिस्थिती, रस्त्यांवरील खड्डे, रस्ते अथवा नाल्याजवळ साचलेला कचरा, व्यक्तींचे पाणीसाठ्याच्या ठिकाणी बुडणे, आग-आगीचे विविध प्रकार, साथीचे रोग, विषारी प्राणी चावण्यासंबंधी बाबी, इमारत कोसळणे, भूस्खलन, पाणी साचणे या आपत्तींची दखल घेण्यात येऊन त्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येईल.

दरम्यान, नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी वरील नमूद पावसाळी कालावधीत सिडको अधिकार क्षेत्रातील मॉन्सून संबंधित तक्रारींसाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.

नागरिकांनी कोणतीही आपत्ती उद्‌भवल्यास नमूद दूरध्वनी अथवा व्हॉटस्‌ॲप क्रमांकावर किंवा ई-मेलद्वारे सिडको आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून आपत्तीसंबंधी माहिती द्यावी किंवा त्याबाबतची तक्रार नोंदवावी.
दूरध्वनी क्र.०२२-६७९१८३८३/८३८४/८३८५, ०२२-२७५६२९९९
व्हॉटसॲप क्र. ८६५५६८३२३८
टोल फ्री क्र. १८००२६६४०९८
फॅक्स क्र. ०२२-६७९१८१९९
ई-मेलः [email protected]

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हरित शव दाहिनी चाचणी यशस्वी