कल्याण मधील सहजानंद चौकात ‘फिरता ट्रॅफिक सिग्नल'
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन त्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून कल्याण (पश्चिम) मधील सर्वात वर्दळीच्या सहजानंद चौकामध्ये कल्याण-डोंबिवली महापालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासनातर्फे ‘फिरत्या ट्रॅफिक सिग्नल'चा अनोखा प्रयोग करण्यात येत आहे.
कल्याण मधील सहजानंद चौकात असलेल्या ५ रस्त्यांचा विचार करता याठिकाणी ‘सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा' प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आली आहे. पुढील महिनाभर सदर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित ठेवून त्यातून येणाऱ्या निष्कर्षानंतर अभ्यास करुन महापालिका तर्फे याठिकाणी कायमस्वरुपी ‘सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा' बसविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका कार्यकारी अभियंता (विद्युत विभाग) प्रशांत भागवत यांनी दिली.
कल्याण (पश्चिम) मधील आग्रा रोड प्रमुख मार्ग असून, दररोज या मार्गावरुन हजारो वाहनांची वर्दळ सुरु असते. या मार्गावरील दुर्गाडी चौक, लालचौकी, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बैल बाजार चौक या प्रमुख चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम मोठे जिकिरीचे आहे. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सहजानंद चौकात कायमस्वरुपी सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मात्र, चौकातील वाहतुकीचा, वर्दळीचा आणि वाहनांच्या संख्येचा अभ्यास न करता सिग्नल यंत्रणा बसवली गेल्यास महापालिकेचा पैसा वाया जाण्याची भीती आहे. कल्याण शहरातील नागरिकांनी महापालिका तिजोरीत जमा केलेला कराचा पैसा विचारात घेऊन कायमस्वरुपी सिग्नल यंत्रणा बसविण्यापूर्वी या सिग्नल यंत्रणाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने ‘सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा' प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आली आहे. पुढील १ महिनाभर या यंत्रणाद्वारे सहजानंद चौकातील वाहतुकीचा अभ्यास करण्याबरोबरच कोणते रस्ते वनवे करणे, कोणता डिव्हायडर मागे घेणे, कोणता हायमास्ट शिपट करणे आदी बाबींचा विचारही केला जाणार आहे. त्यानंतर सहजानंद चौकातील वाहतुकीच्या अनुषंगाने कायमस्वरुपी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे, असे प्रशांत भागवत यांनी सांगितले.