गतिमान प्रशासन अभियान मध्ये केडीएमसी द्वितीय

कल्याण : महाराष्ट्र शासनाच्या उत्तरदायी सुलभ, पारदर्शी आणि गतिमान प्रशासनाच्या अनुषंगाने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान-स्पर्धा, सन २०२४-२५ अंतर्गत राज्यस्तरावरील थेट प्रस्ताव आणि विभागीय समित्यांकडून प्राप्त प्रस्ताव यांच्यामधून राज्यस्तरीय निवड समितीने केलेल्या मूल्यमापनानुसार महापालिका स्तरावरून प्राप्त झालेल्या प्रस्तावातून शासनाच्या २६ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कल्याण-डोंबिवली महापालिकेला ६ लाखांचे द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनांतर्गत येणाऱ्या विविध कार्यालये, विभाग, महापालिका, शासकीय संस्था, कर्मचारी यांनी आपले प्रस्ताव सादर केले होते.

स्पर्धेतील ७ कार्यक्षेत्रांपैकी (कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना-व्यवस्थापन पध्दतींचा अवलंब, सेवांची गुणवत्ता-दर्जा यामधील वाढ आणि उपक्रमांची परिणामकारता, लोकाभिमुखता, ई-गव्हर्नन्स, संसाधनांचा पर्याप्त आणि प्रभावी वापर, तंटा-तक्रार मुक्त कार्यालय, नाविन्यपूर्ण आणि पथदर्शी स्वरुपाच्या संकल्पना, प्रयोग, उपक्रम) ‘केडीएमसी'ने यामधील ई-गव्हर्नन्स या कार्यक्षेत्रांतर्गत अर्ज दाखल केला होता.

‘केडीएमसी'च्या परिवर्तन या प्रकल्पामुळे ई-गव्हर्नन्स विभागाच्या मायनेट-२ दोन प्रणालीद्वारे मालमत्ता करविषयक सर्व सेवा सुविधा ऑनलाईन आणि २४े७ सहजपणे उपलब्ध करुन दिल्याने नागरिकांमध्ये ऑनलाईन सेवाबाबत पसंती आणि विश्वास निर्माण झाल्याने महापालिकेच्या सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या वसुलीत उल्लेखनीय वाढ झालेली आहे.  

मालमत्ता कर विषयक सर्व सेवा-सुविधा ऑनलाईन २४े७ सहज उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना महापालिकेबद्दलचा विश्वास निर्माण झाला. त्यामुळे महापालिकेच्या मागील वर्षाच्या तुलनेत सन २०२३-२४  मध्ये मालमत्ता करवसुलीत लक्षणीय वाढ झालेली दिसून आली. त्यात ऑनलाईन मालमत्ता कराचा वाटा जास्त आहे.

दरम्यान, सदर पारितोषिकामुळे ‘केडीएमसी'च्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिका दोन स्कॉच पुरस्काराने सन्मानित