महापालिका तर्फे २ बहुउद्देशीय पार्किंग व्यवस्था
पनवेल : अतिशय वेगाने विकसित होत असलेले पनवेल शहर बाजारपेठेसाठी सुप्रसिध्द आहे. आसपासच्या परिसरातील नागरिक पनवेल मध्ये खरेदीसाठी येतात. पार्किंगची समस्या असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते. वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने २ बहुमजली वाहनस्थळ (पार्किंग) निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी बहुउद्देशीय प्रकल्प हाती घेतला आहे. २३,७३७ चौरस मीटर क्षेत्रफळ असणारे १० आणि १२ मजली पार्किंग संकुल बांधण्यात येत आहे. काम सुरु झाल्यापासून २ वर्षात प्रकल्प पूर्ण होतील, अशी माहिती महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली आहे.
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या पुढील बाजुस आणि प्रभाग कार्यालय ड-इमारतीच्या बाजुस येथे सदर बहुमजली पार्किंग स्थळ उभारण्यात येत आहेत. यासाठी प्रस्ताव सल्लागार म्हणून मे. डिझाईनो आर्कटिेक्स अँड प्लॅनर्स या संस्थेची नेमणूक केली आहे.
१०, १२ मजली पार्किंग संकुल...
सुमारे ७० कोटी ८५ लाख ५६ हजार ५६१ रुपये खर्चाचे १० मजली संकुल असणार आहे. तळघर-१मध्ये २०७ दुचाकी, तळघर-२ मध्ये २९ चार चाकी, तळमजला १२ व्यावसायिक दुकाने, पहिला मजला १८ व्यावसायिक दुकाने, दुसरा ते सहावा मजला प्रति मजला २८ चार चाकी प्रमाणे १४० चार चाकी वाहने, तसेच सातवा मजला २६ चार चाकी वाहन पार्किंग क्षमता असणार आहे. आठव्या आणि नवव्या मजल्यावर सभागृह असून त्याची आसनक्षमता २८२ आहे. याखेरीस दहाव्या मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह ज्याची आसनक्षमता ५०० अशी आहे.
तर १२ मजली संकुलात तळघर क्रमांक-१ मध्ये १२१ दुचाकी वाहन, तळघर-२ मध्ये १४२ दुचाकी वाहन, तळमजला आणि पहिला मजल्यावर अनुक्रमे ५९ आणि ५६ व्यावसायिक दुकाने, ऑफिससाठी ८ जागा, तिसरा ते बारावा मजला यामध्ये प्रति मजला ४ दुचाकी आणि १५ चार चाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था, याखेरीज मोठे भव्य टेरेस असणार आहे.
बहुउद्देशीय व्यवस्था...
साधारणतः १२१ कोटींचे सदर प्रकल्प आहेत. या दोन्ही वाहन संकुलामध्ये ५१० दुचाकी तर ३४५ चार चाकी वाहनांची पार्किंग सुविधा उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी वाहनांच्या चार्जिंगची व्यवस्था सुध्दा करण्यात येईल. शिवाय वाहन धुण्यासाठी वॉशिंग सेंटर देखील असणार आहेत. संकुलातील व्यापाऱ्यांसाठी वाहन पार्किंग राखीव असेल. शिवाय आसपासच्या परिसरातील नागरिकांना आपले वाहने या ठिकाणी ठेवायची असल्यास त्यांना देखील मासिक आणि वार्षिक भाडेतत्त्वावर वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध असेल. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांसोबतच महापालिकेचे आर्थिक बळकटीकरण देखील यातून होऊ शकते. व्यवसायासाठी १४५ दुकाने, ऑफिससाठीच्या ८ जागा, शिवाय बहुउद्देशीय सभागृहातून होणारे उत्पन्न या बाबी आर्थिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरतील.
अशा प्रकारची सदर भव्य-दिव्य संकुले पनवेल महापालिकेसाठी महत्त्वपूर्ण असणार आहेत. निश्चितच यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या मोठ्या प्रमाणात दूर होईल.