नवी मुंबईत १७२३६ श्रीगणेशमूर्तींसह १९५९ गौरींचे विसर्जन

नवी मुंबई : दीड आणि पाचव्या दिवशी व्यवस्थित रितीने पार पडलेल्या विसर्जन सोहळ्याप्रमाणेच सातव्या दिवशी गौरींसह होणारा श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळाही अत्यंत भावपूर्ण वातावरणात २२ नैसर्गिक आणि १४३ कृत्रिम विसर्जन तलावांवर नवी मुंबई महापालिकेने केलेल्या सुनियोजित व्यवस्थेमध्ये निर्विघ्नपणे संपन्न झाला. महापालिका क्षेत्रात सातव्या दिवशीच्या विसर्जन सोहळयात १७२३६ श्रीगणेशमूर्तींचे आणि १९५९ गौरींचे विसर्जन करण्यात आले. सर्वच ठिकाणी महापालिकेने केलेल्या चोख व्यवस्थेमुळे तसेच सुसज्ज पोलीस यंत्रणेमुळे विसर्जन सुव्यवस्थित रितीने पार पडले.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ‘पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव' साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सातव्या दिवशी ३६०९ शाडुच्या श्रीमूर्तींचे विसर्जन करुन नागरिकांनी पर्यावरणाविषयी जागरुकता दाखविली. शाडुच्या मूर्ती प्रतिष्ठापना करणाऱ्या विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांना महापालिका आयुक्त यांच्या स्वाक्षरीचे स्वच्छता-पर्यावरणमित्र प्रशस्तीपत्र प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. प्रशस्तीपत्राच्या  माध्यमातून नागरिकांचे पर्यावरण जपणुकीबद्दल कौतुक करुन इतरही नागरिकांना त्यादृष्टीने प्रोत्साहित करण्याच्या संकल्पनेचे नागरिकांनी स्वागत केले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ६ फुटापेक्षा कमी उंचीच्या श्रीमुर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे, या आवाहनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला. महापालिकेने संपूर्ण क्षेत्रात १४३ इतक्या मोठया संख्येने निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये ११२३५ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करुन पर्यावरणप्रेमी नागरिकांनी नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण करण्याचा दृष्टीकोन जपला. कृत्रिम विसर्जन तलावांमुळे घरापासून जवळ शांततेत मनोभावे विसर्जन करता येते, अशी भावनाही अनेक नागरिकांनी व्यक्त केली. ६ फुटापेक्षा उंच मूर्तींचे नैसर्गिंक जलाशयांमध्ये विसर्जन करण्यात आले.  

नमुंमपा क्षेत्रातील २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर ३८६० घरगुती तसेच १८२ सार्वजनिक मंडळांच्या ४०४२ श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच १४३ कृत्रिम विसर्जन स्थळांवर ११२०७ घरगुती तसेच २८ सार्वजनिक मंडळांच्या ११२३५ श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे १५०६७ घरगुती आणि २१० सार्वजनिक मंडळांच्या एकूण १५२७७ श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडुच्या ३६०९ श्रीगणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. तसेच १९५९ गौरी विसर्जन करण्यात आले.

स्वच्छ शहर म्हणून असलेला नवी मुंबई महापालिकेचा नावलौकिक जपण्यासाठी सर्व विसर्जन स्थळांवर ओल्या आणि सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आलेले आहेत. येथील निर्माल्य सातत्याने निर्माल्य संकलन वाहनांद्वारे उचलून नेले जात असून तुर्भे येथील प्रकल्पस्थळी निर्माल्याचे पावित्र्य राखून स्वतंत्र संकलन करण्याची आणि योग्य  विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सातव्या विसर्जन दिवशी संकलित झालेल २४.४४० टन निर्माल्य स्वतंत्र वाहनांनी वाहून नेण्यात आले.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी केलेल्या आवाहनास अनुसरुन पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव साजरा करण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून शाडुच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करणे तसेच कृत्रिम तलावात श्रीमूर्ती विसर्जन करणे अशा पर्यावरणपूरक वर्तनाचा अंगिकार केला आहे. अशाच प्रकारचे सहकार्य यापुढील अनंत चतुर्दशी होणाऱ्या विसर्जन काळातही राखावे आणि पर्यावरणशील दृष्टीकोन जपत आपल्या गणेशमूर्तींचे घराजवळच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे.
-डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत ७४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या