गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् बुक'मध्ये भिवंडीकर विद्यार्थ्यांना यश
मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारमधील परिवहन विभागाने रिक्षा चालकांना मराठी भाषा यावी, असे बंधनकारक केले आहे. मनसेने या भूमिकेचे स्वागत केले आहे. काही महाराष्ट्र द्रोही राजकारणी याला विरोध करत आहेत. काही जण संपाची भाषा बोलत आहेत. तरी सर्व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या रिक्षा चालकांनी अशा संपाला, महाराष्ट्र द्रोहींना विरोध करावा यासाठी नवी मुंबई मनसेतर्फे सर्व रिक्षा वर "मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा" अशा आशयाचे स्टिकर रिक्षांवर लावण्यात आले.
मनसे प्रवक्ते तथा शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे मध्यवर्ती कार्यालया बाहेर अनेक रिक्षांवर अशा प्रकारचे स्टिकर लावण्यात आले. यावेळी मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या सह मनसे शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, मनसे रोजगार शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, महाराष्ट्र सैनिक व मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक उपस्थित होते.
यावेळी गजानन काळे व सहकाऱ्यांनी रिक्षा चालकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदीनुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने परवाना देताना रिक्षा चालकाला मराठी येते की नाही हे पाहणे बंधनकारक आहे, अशी माहिती गजानन काळे यांनी दिली. तसेच यापुढे मराठी भाषा बोलणाऱ्यांच रिक्षा परवाना देतात की नाही याकडे मनसेची करडी नजर असेल, असा इशाराही दिला.
यावेळी उपस्थित रिक्षा चालकांनी सुद्धा प्रत्येक रिक्षा चालकाने मराठी बोललेच पाहिजे अशी भूमिका मांडली. तसेच बहुतांश अमराठी रिक्षा चालक सुध्दा मराठीत बोलण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.