मोहने ते अंबिवली रेल्वे स्टेशन रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य          

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका ग्रामीण अ-प्रभाग क्षेत्रातील मोहने ते आंबिवली स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची  दुरवस्था झाली असून या रस्त्याची खड्डे पडल्याने चाळण झाली आहे. रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना तारेवरची कसरत करून वाहने चालवावी लागत आहे.          

मोहने-आंबिवली स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर, उंबर्णी, बल्याणी, टिटवाळाकडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या वर्दळीसह आंबिवली स्टेशन पश्चिम ते मोहने पूर्व परिसरात ये-जा करणाऱ्यांचा मोठा राबता असतो. तर रेल्वे ने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसह, विघार्थी, रेल्वे प्रवासी यांची देखील वर्दळ असते. अशा मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे पाहता संभाव्य अपघाताला आमंत्रण असे चित्र दिसत आहे. अपघातामुळे संभाव्य जीवितहानी झाल्यास यास जबाबदार कोण? असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे.

तरी प्रशासकीय राजवटीत या रस्त्यासंदर्भात दुर्लक्ष का होत आहे. रस्त्यावरुन पावसाच्या पाण्याचा निचारा देखील व्यवस्थित होत नसल्याने या रस्त्याची दुरवस्था वाढत आहे. पाण्याचा मार्ग मोकळा होण्यासाठी रेल्वे प्रशासन, विकासक, केडीएमसी यांच्या समन्वयातून मार्ग काढून प्रश्न मार्गी लावला गेला पाहिजे, असे जाणकारांचे मत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन या रस्ता परिसरातील खड्डे भरुन रस्ता सुस्थितीत केला पाहिजे, अशी मागणी सर्वसामान्य करदाते नागरिक करीत आहेत.                    

दरम्यान, याबाबत अ-प्रभागाचे उपअभियंता हरुण इनामदार यांच्याशी मोहने-आंबिवली स्टेशन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसंर्दभात विचारले असता खड्डे भरण्याचे काम उल्हास नदी पुल परिसरात सुरू असून या रस्त्यावरील खड्डे देखील तातडीने भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये 15 दिवसांच्या बाळाचा परित्याग करुन महिला झाली फरार