महापालिका मालमत्ता कर विभागात ‘अनागोंदी कारभार'
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मालमत्ता कर विभागाकडून नागरिकांच्या अर्जानुसार त्यांच्या मालमत्तांना कर लावणे, वाढीव कर लावणे, मालमत्ता वरील इमारतीस वाढीव करनिर्धारणा करुन सदनिका निहाय विभाजन करणे इत्यादी अर्जाबाबत होणारा आणि मालमत्ता कर विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून अर्थप्राप्तीसाठी देण्यात येणारा त्रास वाढत चाललेला आहे, अशी तक्रार करुन, ‘वारंवार एकाच महापालिका विभाग कार्यालयात बदली करुन घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांची माहिती घेऊन त्यांची इतर विभागात त्वरित बदली करुन महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणावी', अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा ‘भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा'चे कोकण विभाग उपाध्यक्ष सुधीर गोरखनाथ पाटील यांनी नवी मुंबई महापालिका आयुवत डॉ. कैलास शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, मालमत्ता कर कायदा तसेच लोकसेवा हक्क कायदा अंतर्गत मालमत्ता कर संबंधी सेवा पुरविणे कायद्याने आणि नियमांनी घालून दिलेल्या अटी-शर्ती नुसार कारभार करणे, कार्यवाही करणे बंधनकारक असताना सर्वच विभाग कार्यालयातील मालमत्ता कर अधिकारी-कर्मचारी तसेच मालमत्ता कर विभाग, महापालिका मुख्यालय मधील अधिकारी-कर्मचारी नागरिकांना, अर्जदारांना आपल्या मर्जीप्रमाणे बेकायदेशीरपणे नियमबाह्य कागदपत्रांची पुर्तता करण्याचा मौखिक आदेश देतात. उदाहरणार्थ आपल्या अर्जासोबत विकास करारनामा, संमतीपत्र, शपथपत्र, सत्य-प्रतिज्ञापत्र (नोटरी करण्यात आलेले) इत्यादी जोडण्याची या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे उक्त कायद्यात कुठेही अट, नियम, कायदा नसताना निव्वळ स्वहितासाठी सक्ती केली जात आहे. सदर कागदपत्रे अर्जदाराकडून कोणत्या कायद्यान्वये, नियमान्वये, ठरावान्वये, आदेशान्वये मागविण्यात येत आहेत, याची माहिती दिली जात नाही तसेच मालमत्ताकर विभागामार्फत याचा लेखी खुलासा केला जात नाही. सरळ आणि सोप्या करप्रणालीचे अर्थकारणासाठी वरिष्ठांना हाताशी धरुन संगनमताने सदर अनधिकृत कारभार संबंधित अधिकारी/कर्मचारी करत आहेत, अशी नवी मुंबईतील नागरिकांची बोंब आहे, असे सुधीर गोरखनाथ पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.
नवी मुंबई महापालिकेतील काही विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी/कर्मचाऱ्यांनी बदली होऊन देखील पुन्हा त्याच विभागात आपण कमविलेल्या पैशाचा वापर करुन वर्णी लावून घेतली आहे. पूर्वी अतिक्रमण विभाग आणि नंतर त्याच विभाग कार्यालयात मालमत्ता कर त्यामुळे अतिक्रमण विभागात असताना विकासकांना केलेले सहकार्य आणि जुना परिचय सद्या मालमत्ता कर विभागात असताना फायदा मिळवून देत आहे. इतर सर्वसामान्य अर्जदार नागरिकांना पुन्हा-पुन्हा अनधिकृत नियमबाह्य दस्ताऐवज, कागदपत्रे मागवून अनाठायी त्रास भोगायला लावले जात आहे, असे निवेदनात अधोरेखित करुन, ‘वरिल सर्व विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन आणि त्रयस्थ व्यवतींकडून माहिती घेऊन संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना कायद्याप्रमाणे, नियमांप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सुचना कराव्यात तसेच वारंवार एकाच विभाग कार्यालयात बदली करुन घेणाऱ्या अधिकाऱ्याची/कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्यांची इतर विभागात त्वरित बदली करुन महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणावी', अशी मागणी सुधीर पाटील यांनी निवेदनात केली आहे.