एपीएमसी फळ बाजारात कचऱ्याचे साम्राज्य

वाशी : वाशी येथील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील घाऊक फळ बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. एपीएमसी फळ बाजारात सर्वत्र सुकलेले गवत,पेंढा आणि पुठ्याचे ढीग पहायला मिळत आहेत. दररोज वेळेवर  कचरा उचलला जात नसल्यामुळे गवत,पेंढा आणि पुठ्याचे ढीग या कचऱ्यामुळे एपीएमसी फळ बाजारात आग लागण्याची शक्यता व्यापारी वर्तवित आहेत.

एप्रिल, मे महिना एपीएमसी फळ बाजारातील हंगामाचा काळ आहे. एपीएमसी फळ बाजारात सध्या आंब्याचा मुख्य हंगाम आहे. आंबा पॅकिंग करण्यासाठी पेंढा आणि पुठ्ठ्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. एपीएमसी फळ बाजारात येणारा आंबा आणि इतर फळांची पॅकिंग पुठ्यात आणि पेंढ्या मध्ये केलेली असते. त्यामुळे पेंढा आणि पुठ्ठे यांचा कचरा बाजारात मोठ्या प्रमाणात पडलेला असतो. यामुळे बाजारात गाळ्यांच्या धक्क्या खाली मोठ्या प्रमाणात पेंढा आणि पुठ्ठे यांचा कचरा पडल्याचे चित्र दिसत आहे. पेंढा आणि पुठ्ठे यांचा कचरा वेळेवर उचलला जात नाही, असा आरोप एपीएमसी फळ बाजारातील व्यापारी करत आहेत.

आधीच एपीएमसी फळ बाजारात खराब फळे, त्यांचा कचरा मोठ्या प्रमाणात पडलेला असतो. त्यात आत्ता पेंढा आणि पुठ्ठे या कचऱ्याची भर पडली आहे. त्यामुळे एपीएमसी फळ बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले असून, कचऱ्यामुळे एपीएमसी फळ बाजारातील बकालपणा वाढत आहे.

सध्या एपीएमसी फळ बाजारात आंबा पॅकिंगचे काम सुरु आहे. त्यामुळे बाजारात पेंढा आणि पुठ्ठे यांची गरज भासत असते. शिवाय बाजारात येणाऱ्या मालामध्येही पेंढा असतो. अनेकदा कामगार विडी पिऊन माचिसची काडी इकडे-तिकडे टाकून देतात. त्यामुळे आग लागण्याचे प्रकार बाजारात नेहमी होत असतात. या पेंढा ,पुठ्ठ्याच्या कचऱ्याला तर दरवर्षी आग लागत असते. आत्ता एपीएमसी फळ बाजारात अनेक ठिकाणी पेंढा, पुठ्ठे याचा कचरा पडलेला असतो. त्यामुळे या ठिकाणी आग लागली तर त्याची जबाबदारी कोण घेणार?, आगीत होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?, असा प्रश्न एपीएमसी फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

उभ्या वाहनांमुळे स्वच्छतेत अडथळा

एपीएमसी बाजारात अनेक ठिकाणी  मालाच्या गाड्या  दोन ते तीन दिवस पार्क केलेल्या असतात. त्यामुळे त्या ठिकाणी स्वच्छता करण्यास स्वच्छता कर्मचाऱ्यांना अडचण येते. स्वच्छता कर्मचारी नेहमीच मोकळ्या दिसणाऱ्या जागेवर सफाई करुन पुढे जातात. त्यामुळे विनाकारण बाजारात उभ्या असलेल्या गाड्या हटवण्यात याव्यात, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

सकाळच्या सत्रात एपीएमसी फळ बाजारात मोठ्या प्रमाणात फळ गाड्यांची आवक होऊन त्या खाली होत असताना त्यातील गवत, कागद आदी कचरा खाली टाकला जातो. मात्र, वाहने खाली होऊन निघताच नित्याने या ठिकाणी साफसफाई केली जाते. - राजू कोंडे, उप सचिव - फळ मार्केट, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी). 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका मालमत्ता कर विभागात ‘अनागोंदी कारभार'