पिसवली ग्रामस्थांची लवकरच डम्पिंगच्या दुर्गंधीतून मुक्तता
कल्याण : पिसवली परिसरातील नागरिकांची डम्पिंगच्या दुर्गंधीपासून मुक्तता होणार असून पिसवली देशमुख होम्स परिसरातील कचरा हटविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ मागणी करीत होते. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन डम्पिंग ग्राऊंडच्या जागेचे बगीच्यात रुपांतरण करण्यासाठी आमदार राजेश मोरे यांनी पुढाकार घेतला आहे.
रस्त्याच्या कडेला सातत्याने कचरा फेकला जात असल्याने पिसवली आणि देशमुख होम्स दरम्यानच्या सुंदर जागेचे भराव भूमीत रुपांतर होत असल्याची बाब कळताच ‘कल्याण ग्रामीण'चे आमदार राजेश मोरे यांनी तत्काळ या जागेची पाहणी करत वन विभागाच्या अधिकार्यांना सूचना दिल्या. यानंतर सदर परिसर स्वखर्चाने स्वच्छ करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच भविष्यात सदर जागेचे पुन्हा कचरा कुंडीत रुपांतर होऊ नये यासाठी या ठिकाणी वृक्षारोपण करत या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे आश्वासन आमदार मोरे यांनी दिले. तसेच सदर भूखंडालगत असलेल्या स्मशानभूमीत देखील नागरिकांच्या सोयीसाठी बाकडे बसवून या स्मशानभूमी परिसराचे सुशोभिकरण करणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.
कल्याण ग्रामीण मतदारसंघात येणाऱ्या पिसवली आणि देशमुख होम्स परिसर दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेवर परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कचरा फेकला जात असल्याच्या तक्रारी आ. राजेश मोरे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत सदर परिसराचा आमदार मोरे यांनी २ दिवसापूर्वी पाहणी दौरा केला. यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देत या परिसरातील कचऱ्याची स्वच्छता स्वखर्चाने सुरु केली.
तसेच या परिसरात कचरा टाकून या परिसराचे सौंदर्य नष्ट करू नका, असे आवाहन परिसरातील नागरिकांना करताना सदर जागेत लवकरच वृक्षारोपण करत परिसर सुंदर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सदर भूखंडालगत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करुन स्मशानभूमीची देखील डागडुजी करण्याचे आश्वासन आमदार मोरे यांनी दिले.
स्वच्छतेच्या कामाची देखील आमदार मोरे यांनी पाहणी केली. याप्रसंगी डोंबिवली शहर सचिव तथा विद्यानसभा क्षेत्रप्रमुख संतोष चव्हाण, उपतालुकाप्रमुख विलास भोईर, शाखाप्रमुख मिनार पाटील, जयेश माळी, गणेश मोहिते, सुभाष पार्चा, ग्रामस्थ प्रल्हाद भोईर, विश्वास भोईर, नकुल भोईर, सत्यवान पाटील, धीरज राजभोज, उमेश तळेकर, प्रीतम पाटील, हेमंत भोईर, वासुदेव भोईर, सुनील भोईर, भगवान माळी, नरेश भोईर, किशोर म्हात्रे, वर्षकेत माळी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.