द्रोणागिरी नोडमधील लाभार्थ्यांसाठी ‘सिडको'ची सोडत
मुंबई : उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘सिडको'च्या १२.५ टक्के योजना अंतर्गत द्रोणागिरी नोडमधील ३१९ पात्र लाभार्थ्यांना इरादापत्राचे वाटप करण्यात आले. ‘सिडको'तर्फे सदर भूखंडांसाठी सोडत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय ११ जून २०२५ रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. द्रोणागिरी नोडमधील प्रकल्पबाधितांसाठी शेवटची सोडत सन २००७ मध्ये घेण्यात आली होती.
याप्रसंगी ‘सिडको'चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, सिडको सह-व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, सिडको, मुख्य भूमी-भूमापन अधिकारी, संदीप निचित, दिपक आकडे आणि पात्र लाभार्थी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमधील ३१९ पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इरादापत्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर मंत्रालयातील दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात इरादापत्रांचे वाटप करण्यात आले.
ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि उरण तालुक्यातील ९५ गावातील जमिनी संपादित करताना त्यांना १२.५ टक्के योजना अंतर्गत भूखंड वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजना अंतर्गत ९४ टक्के लाभार्थ्यांना भूखंडांचे वितरण पूर्ण झाले होते. तर उर्वरित ५.५९ टक्के भूखंडाचे वाटप शिल्लक होते. त्यामुळे या नोडमधील ३१९ पात्र लाभार्थ्यांना १२.५ टक्के भूखंड वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
त्यानुसार सदर पात्र लाभार्थ्यांना १ लाख ९० हजार चौरस मीटर भूखंड क्षेत्राचे वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ३१९ पैकी २४ पात्र लाभार्थ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते प्रातिनिधिक स्वरुपात इरादापत्रांचे वाटप करण्यात आले.