ठाणे जिल्ह्यामध्ये १६ हजार ९०३ घरकुलांचे भूमिपूजन संपन्न
ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यामध्ये ‘महा आवास अभियान २०२४-२५' राबविण्यात येत आहे. यामध्ये घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणे, मंजुर घरकुलांना पहिला हप्ता वितरीत करणे, सर्व घरकुले भौतिकदृष्टया पूर्ण करणे, आदी उपक्रम समाविष्ट आहेत. त्याअनुषंगाने ‘ठाणे जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हयात सर्वत्र एकाच दिवशी केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेंतर्गत एकूण १६ हजार ९०३ घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम २७ मार्च रोजी सकाळी १० वाजता सर्व ग्रामपंचायती मध्ये आयोजित करण्यात आलेला होता.
भिवंडी तालुक्यातील राहूर ग्रामपंचायत मधील कुंभारपाडा येथे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि ‘ठाणे जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते घरकुलांचे भूमीपूजन करण्यात आले. तसेच अशोक शिनगारे आणि रोहन घुगे यांनी शहापूर, मुरबाड येथील ग्रामपंचायतींच्या घरकुल भूमीपूजन समारंभास भेट दिली.
कल्याण तालुक्यातील घोटसई ग्रामपंचायत मध्ये घरकुल भूमीपूजन कार्यक्रम ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्या उपस्थितीत पार पडला.
घरकुल भूमीपूजन सोहळ्यास ठाणे जिल्हयात सर्वच ग्रामपंचायत स्तरावर लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, लाभार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.