एक गांव, एक गणपती
नवी मुंबई: ६५ वर्षांपूर्वी बेलापूरच्या आग्रोळी गावातील कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांनी घराघरातील गणपती उत्सव बाजुला ठेऊन ‘एक गांव, एक गणपती' या उवतीनुसार एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली. विशेष म्हणजे ६५ वर्षांनंतरही आजही ती परंपरा गावातील तिसऱ्या पिढीनेही जपली आहे. त्यामुळे संपूर्ण गावात एकच गणपती येतो आणि एकच गणेशोत्सव उत्साहाने साजरा होतो. १४ कुटुंबांपासून सुरु झालेला सदर आदर्श उपक्रम यावर्षी १४१ कुटुंबांपर्यंत पोहोचला आहे. ‘एक गांव, एक गणपती'च्या या आदर्श गणेशोत्सवात एकही वर्ष खंड पडलेला नाही.
पूर्वी, परंपरागत पध्दतीनुसार, घराघरात प्रत्येक कुटुंबाचा गणपती साजरा होत असे. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या गणपतीची सेवा करण्यात मग्न असे आणि गणेशोत्सव काळात कुणालाच कुणाकडे जायला वेळ मिळत नसे. त्यावेळी कॉ. भाऊ पाटील यांनी एक वेगळा विचार मांडला. त्यांनी लोकमान्य टिळकांचा विचार पुढे आणून वैयक्तिकरित्या साजरा होणारा उत्सव सार्वजनिक होऊन एकत्र साजरा व्हायला हवा. घराघरांत होणारा गणपती उत्सव बंद करुन गावात एकच गणपती उत्सव सुरु करण्याची संकल्पना कॉ. भाऊ पाटील यांनी ग्रामस्थांसमोर मांडली. गणेशोत्सवात होणारा वारेमाप खर्च टाळता येईल आणि सर्वांना एकत्र आणण्याची संकल्पना त्यांनी समजावून सांगितली. ती संकल्पना सर्वांना ती पटल्यानंतर १९६० पासून संपूर्ण आग्रोळी गावात एकच गणपती बसू लागला.
आग्रोली गावातील आजच्या तिसऱ्या पिढीनेही ‘एक गांव, एक गणपती'ची परंपरा जपली आहे. त्यामुळे गावात कुणाच्याही घरी स्वतंत्र गणपती उत्सव होत नाही. कुठलाही सार्वजनिक मंडळाचा गणपती उत्सव होत नाही. गावातील गणेश मंदिरातच गणेशोत्सव साजरा होतो. गावातील प्रत्येक कुटुंबाप्रमाणे वर्गणी काढली जाते, तीच पध्दत आजही राबवली जाते. पिढी वाढल्याने कुटुंब वाढले, ज्याचे कुटुंब आहे म्हणजे ज्याचे लग्न झाले आहे, त्याच्या प्रत्येकाकडून वर्गणी गोळा केली जाते आणि त्यातून उत्सव साजरा होतो. यावर्षी प्रत्येक घरातून २ हजार रुपये इतकीच वर्गणी गोळा केली आहे.
दहा दिवसांच्या उत्सवामध्ये लहान मुलांचे अनेक कार्यक्रम राबवले जातात. यात चित्रकला, निबंध, वक्तृत्व आणि नाटकांचे सादरीकरण देखील केले जाते. दहा दिवस भजन-संध्या बरोबर महिलांचे कार्यक्रम आवर्जुन घेतले जातात. सर्व ग्रामस्थ मिळून उत्सव साजरा करतात. गणपतीच्या नैवेद्यापासून सर्व काही एकत्रच होते. विसर्जन मिरवणूक तर डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. कोणताही वारेमाप खर्च नाही की कशाचा भपका नाही. अतिशय साधेपणाने साजरा होणारा उत्सव फक्त आग्रोळीतच पाहायला मिळतो. त्यामुळे संपूर्ण नवी मुंबईत या उत्सवाची चर्चा असते. गेली ६५ वर्षे आमच्या गावात ‘एक गांव, एक गणपती' उत्सव सर्व ग्रामस्थ मिळून उत्साहाने साजरा करत आहेत, असे कॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.
सध्या आग्रोळी गांवच्या गणेशोत्सव मंडळाची जबाबदारी अध्यक्ष रोहिदास पाटील, उपाध्यक्ष राजेश पाटील, सचिव संजय पाटील, आणि खजिनदार स्वरुप पाटील आणि त्यांचे सहकारी सांभाळत आहेत.