नमुंमपाच्या वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा प्रकल्पास राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार
नवी मुंबई : ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान-स्पर्धा' यामध्ये सर्वोत्कृष्ट कल्पना उपक्रम कॅटेगरीमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या ‘थ्रेडस् ऑफ चेंज' या अभिनव उपक्रमास राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले असून त्याबद्दल महापौर सुजाता पाटील यांनी एप्रिल महिन्याच्या सर्वसाधारण सभेत अभिनंदन केले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, उद्यान विभागाच्या उपायुक्त स्मिता काळे यांनी सादर केलेल्या ‘वस्त्र पुर्नप्रक्रिया सुविधा प्रकल्पास सदर बहुमान प्राप्त झाला असून कापडी कचऱ्याला नवे रुप देऊन कचरा कमी करणाऱ्या आणि स्वच्छतेला नवा आयाम देणाऱ्या या पर्यावरणपूरक प्रकल्पाची नोंद सर्व स्तरावर कौतुकाने घेतली जात आहे.
केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयाच्या ‘वस्त्र समिती'मार्फत ‘नमुंमपा'च्या वतीने सीबीडी-बेलापूर, सेक्टर-१ येथे सदर वस्त्र पुर्नप्रक्रिया सुविधा (टीआरएफ) केंद्र सुरु असून यामध्ये एसबीआय फाऊंडेशन, टिसर आर्टिसन्स ट्रस्ट, आयडीएच इंडिया या संस्थांचा सहयोग आहे. या अंतर्गत वस्त्र कचरा संकलनासाठी १०० हून अधिक सोसायट्यांमध्ये वापरल्यानंतर टाकून दिले जाणारे सुस्थितीतील कपडे पुनर्प्रक्रियेकरिता देण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या वस्त्र संकलन पेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याठिकाणी संकलित वस्त्रांची नोंद करण्याकरिता लॉगबुक ठेवण्यात आलेले असून सोसायटीनिहाय पेट्या टॅगींग करण्यात आलेल्या आहे. सदर कपडे संकलित करुन टीआरएफ केंद्रात आणण्यासाठी टिपर वाहन उपलब्ध करुन देण्यात आलेले असून केंद्राच्या ठिकाणी वाहनातून आणलेल्या कपड्यांचे त्यांच्या प्रतवारीनुसार वर्गीकरण करण्यात येते. त्याचप्रमाणे तेथे कोशा स्कॅनरद्वारे कापूस, पॉलिस्टर, रेशीम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांचे वर्गीकरणही केले जाते. त्यानंतर त्या वस्त्रांवर त्यांच्या गुणवत्तेनुसार योग्य प्रक्रिया केली जाते.
ऑगस्ट २०२५ पासून आत्तापर्यंत वापरानंतरच्या वस्त्राचा ४१,५०० किलो कचरा याठिकाणी आणण्यात आला असून त्यावर पुर्नप्रक्रिया करून त्यापासून ४०० हून अधिक उत्पादने तयार करण्यात आलेली आहेत. याविषयीच्या जनजागृतीसाठी ७५ कार्यशाळा घेण्यात आलेल्या असून ११५०० हून अधिक कुटुंबे या उपक्रमाशी जोडली गेलेली आहेत.
विशेष म्हणजे टीआरएफ केंद्रामध्ये विविध प्रकारच्या कापडी वस्तू आणि साहित्य निर्मितीसाठी ३०० हून अधिक महिलांना कौशल्य विकासात्मक प्रशिक्षण देण्यात आलेले असून १५० हून अधिक महिलांना प्रतिमहिना ९ ते १५ हजार इतका रोजगार उपलब्ध झालेला आहे.
केंद्र सरकारची वस्त्र समिती आणि नवी मुंबई महापालिका एकत्रितपणे राबवित असलेला सदर प्रकल्प नागरी घनकचरा व्यवस्थापन, चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना आणि महिला सक्षमीकरण या तिन्ही धोरणात्मक उद्दिष्टांची एकत्रित अंमलबजावणी करणारा महापालिका स्तरीय देशातील पहिला प्रकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अभिनव प्रकल्पाचे कौतुक केलेले आहे.
आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) स्पर्धेमध्ये थ्रेडस् ऑफ चेंज या पर्यावरणशील आणि महिला सक्षमीकरणाला नवे आयाम देणाऱ्या प्रकल्पाच्या नाविन्यपूर्णतेची नोंद घेत पथदर्शी स्वरूपाच्या संकल्पना, प्रयोग म्हणून टीआरएफ सुविधा केंद्रास राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आलेले आहे.