ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करा; नंतरच भरती प्रक्रिया राबवा...
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका सेवेत १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ समाधानकारक सेवा देणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम महापालिका सेवेत नियमित करावे, यानंतर ‘नमुंमपा'मध्ये नोकर भरती प्रक्रिया राबवावी, अशी विनंती इंटक संलग्न ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'च्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच नवी मुंबई महापालिकेने सदर विनंतीकडे दुर्लक्ष करुन नोकर भरती प्रक्रिया राबविल्यास कामगार संघटना उग्र आंदोलन करेल अथवा न्यायालयाचे दार ठोठावेल, असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे.
दरम्यान, सदर मागणीचे पत्र ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'तर्फे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास विभागचे प्रधान सचिव आणि नवी मुंबई महापालिका आयुवत डॉ. कैलास शिंदे यांना देण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिका आस्थापनेवर ठोक मानधनावर सद्यस्थितीत अनेक कर्मचारी लिपिक, शिक्षक, लेखा लिपीक, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, औषध निर्माता, एनएम तापमान, वाहन चालक, स्थापत्य, अभियंता अशा विविध संवर्गात कार्यरत आहे. गेली १० ते १५ वर्ष सदर कर्मचारी इमानेइतबारे तुटपुंज्या वेतनावर आपली सेवा देत असून प्रत्येक ६ महिन्यांनी विभागप्रमुख त्यांची सेवा समाधानकारक आहे आणि त्यांच्या सेवेची महापालिकेला आवश्यकता आहे, असे प्रमाणित करत असतात.
दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक विशेष रजा याचिका क्र.५५५८०/२०२४ मधील निकाल आणि २ विशेष रजा ुयाचिका क्र.११०८६/२०२४ यावर दोन्ही विशेष रजा याचिका एकत्रित करुन न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यानुसार सेवेत १० वर्षे किंवा अधिक वर्षे झालेल्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने वरील दोन्ही प्रकरणात दिला आहे. याच धर्तीवर नवी मुंबई महापालिका सेवेत १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ समाधानकारक सेवा देणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करावे, अशी विनंती ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'ने सदर पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि इतर संबंधितांना केली आहे.
वास्तविक पाहता ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना वय उलटून गेल्याने इतरत्र नोकरी मिळू शकणार नाही आणि अतिशय कमी उत्पन्न असल्याने आर्थिक अडचणीमुळे त्यांची ससेहोलपट होत आहे. यामुळे ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना न्यायोचित नियमित करावे. याबाबत निर्णय होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करावी, अशी विनंतीही ‘युनियन'ने केली असून अन्यथा संघटना उग्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.