पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्यासाठी १५ मे डेडलाईन
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या सुरु असलेली रस्ते, गटारे, पदपथ, मलनिःस्सारण वाहिन्या, कल्व्हर्ट यांची कामे १५ मे पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश देतानाच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व प्राधिकरणांनी परस्पर समन्वय राखून पावसाळी कालावधीत कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही याची काळजी घेण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी करावी, असे स्पष्ट केले.
नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘शहर आपत्ती व्यवस्थापन समिती'ची नियोजन बैठक पार पडली. याप्रसंगी ‘समिती'चे सचिव तथा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, आपत्ती व्यवस्थापन उपायुक्त ललिता बाबर आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कार्यकारी अभियंता तसेच वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) रश्मी नांदेडकर, ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ, पीडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता कल्याणी गुप्ता, एपीएमसी सहसचिव डॉ.महेश साळुंके-पाटील तसेच सिडको, एमआयडीसी, एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, पोलीस आणि वाहतूक पोलीस, औद्योगिक सुरक्षा विभाग, एपीएमसी, एमपीसीबी, रेल्वे, बेस्ट, महावितरण, एपीएमसी, महानगर गॅस लि., टीबीआयए, स्मॉल स्केल इंड.असो., मच्छीमार संघटना आदि विविध प्राधिकरण, संस्था यांचे अधिकारी उपस्थित होते.
आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने त्याआधी करावयाचा अत्यावश्यक कामांचा बाबनिहाय सविस्तर आढावा घेतला. यामध्ये विशेषत्वाने पावसाळ्याआधी करण्यात येणारी नालेसफाई आणि मोठ्या गटारांची सफाई तत्परतेने सुरू करावी आणि नियोजित वेळेत पूर्ण करावी. सफाई करताना नाले आणि गटारे यांच्या काठावर काढून ठेवला जाणारा गाळ सुकल्यानंतर १ ते २ दिवसातच उचलला जावा याची काटेकोर काळजी घ्ोण्यात यावी. महापालिका क्षेत्रात आत्यंतिक गरजेशिवाय कोणत्याही नवीन खोदकामाची परवानगी देण्यात येऊ नये. असे दोन्ही परिमंडळ उपायुक्तांना सूचित करतानाच दिलेल्या परवानग्यांची कामे १५ मे पर्यंत पूर्ण करुन ते खोदकाम व्यवस्थितरित्या पूर्ववत केले जाईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांमार्फत देण्यात आले.
नमुंमपा क्षेत्रात एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणावर रस्ते आणि इतर कामे सुरु असून ती कामे जलद पूर्ण करण्यात यावी. दरड कोसळण्याच्या संभाव्य जागांची महापालिका आणि एमआयडीसी यांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी संयुक्त पहाणी करावी. तसेच त्या परिसरात नागरिकांचे वास्तव्य असल्यास त्यांना दरड कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात आणून देऊन त्यांचे तत्परतेने स्थलांतरण करावे. विशेषत्वाने दिघा इलठणपाडा धरणाच्या खाली असणाऱ्या झोपड्यांच्या स्थलांतरणविषयक आवश्यक कार्यवाही करावी. तसेच नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात असलेल्या झोपडपट्ट्या स्थलांतरणाबाबतही कार्यवाही करण्याचे आयुक्त डॉ. शिंदे यांनी सूचित केले.
पावसाळी कालावधीपूर्वी धोकादायक झाडे आणि झाडांच्या फांदयांची गरजेएवढी छाटणी करण्याबाबत कार्यवाही सुरु करावी. पावसाळी कालावधीत जोरदार वाऱ्यामुळे पडणाऱ्या फांद्या लगेच उचलण्याबाबतच्या कार्यवाहीचे विभागवार नियोजन करावे. धोकादायक इमारती अत्यंत महत्वाचा विषय असल्याचे लक्षात घेत धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्या स्थलांतराबाबत आवश्यक कार्यवाही सुरु करावी. यामध्ये विशेषत्वाने गांवठाण भागातील इमारतींच्या स्थितीचीही पाहणी करण्यात यावी. बांधकाम साईटस्वर धूळ नियंत्रण आणि पावसाळी कालावधीत अपघात होऊ नयेत, यादृष्टीने संबंधितांना पूर्वसूचना देण्याचे आणि खबरदारी घेण्याचे निर्देशित करण्यात आले.
आपत्ती येऊच नये यादृष्टीने खबरदारी घेणे आणि आपत्ती आलीच तर त्यामध्ये फार हानी होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी. घाटकोपर येथील होर्डींग दुर्घटना लक्षात घेता महापालिकेसह सिडको, रेल्वे, पीडब्ल्यूडी आणि इतर प्राधिकरणांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील होर्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे. अनधिकृत होर्डींग हटविण्याची कार्यवाही करावी. ‘पीडब्ल्यूडी'कडे शहरातील मुख्य आणि मध्यवर्ती सायन-पनवेल महामार्ग खड्डेमुक्त आणि सुस्थितीत रहावा यादृष्टीने काळजी घ्यावी. सिडको आणि रेल्वे प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने रेल्वे स्टेशन्स मधील आवश्यक कामे पूर्ण करावीत.
-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका.