व्यापक जनसहभागातून सेवा हक्क दिन उत्साहात साजरा  

नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ राज्यभरात लागू होऊन २८ एप्रिल रोजी १० वर्षे पूर्ण झाली. या दशकपूर्तीचे औचित्य साधून २८ एप्रिल रोजी ‘सेवा हक्क दिन' साजरा करण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार नवी मुंबई महापालिका तर्फे जनसहभागावर भर देत विविध उपक्रम राबविण्यात आले.

नमुंमपा मुख्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करीत सेवा हक्क दिनानिमित्त सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालयातील ॲम्पिथिएटरमध्ये एकत्र येत मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांच्यासह सामुहिक शपथ ग्रहण केली. याप्रसंगी महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, उपायुक्त अभिलाषा म्हात्रे, सहा. आयुक्त प्रबोधन मवाडे, सहा. आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण, प्रशासकीय अधिकारी संजीव पवार, मुख्य स्वच्छता अधिकारी संजीव शेकडे, विधी अधिकारी अभय जाधव आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसेवांविषयी आणि त्या लोकसेवा नागरिकांना पुरविण्यासाठी महापालिका राबवित असलेल्या ऑनलाईन प्रणालीसह इतर सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत व्यापक स्वरुपात पोहोचण्यासाठी विशेष पथनाट्याचे सादरीकरण महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी होत असून त्याचा आरंभ करण्यात आला.

लोकसेवा हक्क दिवसाची तसेच त्या माध्यमातून लोकसेवांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी महापालिका मुख्यालयासह विभाग कार्यालये आणि इतर कार्यालयांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम विषयी माहिती देणारे बॅनर प्रदर्शित करण्यात आले असून त्यावर अधिसूचित सेवा आणि शुल्काची माहिती सहजपणे उपलब्ध होण्यासाठी क्यूआर कोड प्रसिध्द करण्यात आले आहेत.

नागरिक आपल्या मोबाईलवर सदर क्यूआर कोड स्कॅन करून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम विषयीचा शासन निर्णय आणि त्याची माहिती उपलब्ध करून घेऊ शकतात. तसेच ‘नमुंमपा'च्या वतीने उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या ६८ लोकसेवांची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतात. त्याचप्रमाणे सदर सेवा उपलब्धतेबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार करावयाची असल्यास त्यासाठीचा क्यूआर कोडही या बॅनरवर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. याशिवाय समाजविकास विभागाच्या वतीने ८ विभाग कार्यालय क्षेत्रात लोकसेवा हक्क कायद्याविषयी जागरुकता मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी महिला बचत गटाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावे यशस्वी केले.

६८ लोकसेवा एका क्लिकवर ऑनलाईन उपलब्ध...
नागरिकांना महापालिकेशी संबंधित लोकसेवा तत्परतेने उपलब्ध करून देण्यासाठी नमुंमपा कटीबध्द असून सेवा विनासायास एका क्लिकवर उपलब्ध व्हाव्यात याकरिता माझी नवी मुंबई - My NMMC ॲप उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच ‘नमुंमपा'च्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवरुनही नागरिक या सेवा उपलब्ध करून घेऊ शकतात. नागरिकांनी महापालिकेने पुरविलेल्या या सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
-डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर मध्ये महापालिका तर्फे ‘ट्राफिक पार्क' उभारणी