दिवा मधील फेरीवाल्यांविरुध्द ‘भाजपा'चा रास्ता रोको
कल्याण : दिवा मधील फेरीवाल्यांविरोधात ‘भाजपा'ने १७ जुलै रोजी जनआंदोलन करत तब्बल पाऊण तास रास्ता रोको केला.
वारंवार ठाणे महापालिका प्रशासनाकडे फेरीवाला मुक्त दिवा आणि रस्ते करण्यासाठी ठोस कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर दिवा मधील भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत रास्ता रोको केला. तब्बल पाऊण तास दिवा चौकात रास्ता रोको केल्याने दिवा-अगासन रोड आणि दिवा-खार्डी रोड या दोन्ही रस्त्यावर प्रचंड वाहतूक काेंडी झाले. यावेळी पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. सदर ‘रास्ता रोको'मध्ये भाजप नेते संजय वाघुले, शिवाजी आव्हाड, नंदू परब, सचिन भोईर, विजय भोईर, सपना भगत, सीमा भगत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
तर या आंदोलना बाबत भाजप दिवा शहर मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी सांगितले की, स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसत असतात. त्यामुळे रोज वाहतूक काेंडी होऊन याचा फटका दिवेकरांना बसत आहे. महापालिका प्रशासनाकडे तक्रार करुन सुध्दा ते दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आम्हाला आंदोलन आणि रास्ता रोको करायला लागला. तसेच यावेळी भोईर यांनी सत्ताधारी ‘शिवसेना'ला टोला लगावताना मित्रपक्ष असून सुध्दा तो आमच्यासोबत नाही, अशी खेदाची बाब आहे. आज आम्ही दिवावासियांसाठी लढत आहोत आणि जोपर्यंत फेरीवाला मुक्त शहर करणार नाही, तोपर्यंत लढा चालू राहील, असे सचिन भोईर यांनी यावेळी स्पष्ट केले.