मिरा-भाईंदर महापालिकेची २४१.५९ कोटींची विक्रमी कर वसुली

भाईंदर : ३१ मार्च २०२५ रोजी मध्यरात्रीपर्यंत मिरा-भाईंदर महापालिका मालमत्ता कर विभागामार्फत २४१ कोटी ५९ लाखाची विक्रमी कर वसुली करण्यात आली आहे. मालमत्ता कर वसुलीचा वेग आणखी जास्त प्रमाणात वाढवण्यात यावा यासाठी आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी मालमत्ता कर विभाग आढावा बैठकांमध्ये मालमत्ता कर वसुलीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मिरा-भाईंदर शहरामधील बऱ्याचशा मालमत्ता धारकांकडे वर्षानुवर्षे थकबाकी असल्याने अशा थकित मालमत्तांबाबत महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार  मालमत्ता जप्ती आणि त्यावर महापालिकेचे नाव चढवून मालमत्ता जाहीर लिलावद्वारे विक्री करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याबाबत सतत शहरातील नागरिकांमध्ये विशेष जनजागृती देखील करण्यात आली होती. सदर कारवाईस सुरुवात होताच आणि जनजागृतीमुळे शहरातील मालमत्ता धारकांनी कर भरणा करण्यास सुरुवात केली.

त्याचा परिणाम म्हणून ३१ मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत मिरा-भाईंदर महापालिका मालमत्ता कर विभागामार्फत २४१ कोटीची विक्रमी कर वसुली करण्यात आली आहे. या २४१ कोटी मालमत्ता कर वसुली करण्याचे श्रेय आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (कर विभाग), नियंत्रण अधिकारी, सहाय्यक नियंत्रण अधिकारी, मालमत्ता कर विभागप्रमुख, सर्व कर निरीक्षक, कर वसुली लिपीक आणि कर्मचारी यांना दिले आहे. गतवर्षी ३१ मार्च २०२४ रोजी १९३ कोटी रुपये इतकी कर वसुली करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची मालमत्ता कर वसुली उत्कृष्टरित्या आणि वेगाने झाली असून  ४८ कोटी इतकी अधिक वसुली करण्यात आली आहे.

आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या निर्देशानुसार उपायुक्त (माहिती-तंत्रज्ञान) यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती-तंत्रज्ञान विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या www.mbmc.gov.in वेबसाईट आणि MyMBMC मोबाईल ॲपचा वापर करून मालमत्ता कर भरणा करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ऑनलाईन पध्दतीवर विशेष भर देत १ लाख ४० हजार नागरिकांनी रोख रक्कम तर धनादेशाद्वारे १ लाख ५९ हजार ५६० नागरिकांनी कर भरणा करुन महापालिकेला सहकार्य केले आहे. मिरा-भाईंदर महापालिका कोषाग्रहामध्ये एकूण मालमत्ता कर २४१ कोटी ५९ लाख ९८ हजार ९३२ रुपये इतका जमा करण्यात आलेला आहे. महत्वपूर्ण बाब म्हणजे ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ३६५ रवकमेचे ३८५ धनादेश बँक खात्यात जमा करण्यात आले असून ते बँकेच्या मंजुरीकरिता प्रलंबित आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रिझर्व्ह बँक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू