किसननगर मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला
ठाणेः किसननगर येथील मस्जिद गल्लीत २ सप्टेंबर रोजी दुपारी तिवारी सदन या जुुन्या इमारतीचे दुरुस्तीचे काम चालू असतानाच अचानक या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर इमारत खाली करुन १७ रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले.
किसननगर मस्जिद गल्ली परिसरात सदर ४० वर्ष जुनी इमारत तिवारी यांच्या मालकीची आहे. सध्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम चालू होते. २ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास अचानक दुसऱ्या मजल्यावरील रुम नंबर-६ मध्ये राहणाऱ्या रीता प्रकाश उपाध्याय यांच्या घरामधील स्लॅबचा भाग पडला. या घटनेची माहिती मिळताच वागळे प्रभाग समिती कार्यालयीन अधीक्षक, वागळे प्रभाग समिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनासह आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी मदतकार्यासाठी धाव घेतली. सदरची इमारत सी २ बी (इमारत रिकामी करुन संरचनात्मक दुरुस्ती करणे) या वर्गवारीत येणारी आहे.
घटनेनंतर संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून ठाणे महापालिका शाळा क्र.२३ येथे तिवारी सदन मधील १७ रहिवाशांची तात्पुरत्या स्वरुपात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचाऱ्यांनी धोकापट्टी लावून बॅरिगेटिंग केले आहे.