गुडबाय पोलिओ

नवी मुंबई : पोलिओ प्रतिबंध आणि पोलिओचे उच्चाटन करण्याचा निश्चय करुन त्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी  २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण जगभरात ‘जागतिक पोलिओ दिन' म्हणून साजरा केला जातो. ‘पोलिओमुक्त जग' असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याबाबत सुरु असलेल्या कामांना प्रोत्साहित करीत लसीकरण मोहिमांचे महत्व या दिवशी अधोरेखीत केले जाते.

या वर्षीची पोलिओ दिनाची संकल्पना ‘पोलिओ समाप्त करा : प्रत्येक बालक, प्रत्येक लस, प्रत्येक ठिकाणी (End Polio : Every Child, Every Vaccine, Everywhere.)’ अशी असून त्यादृष्टीने जागरुकता निर्माण करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई जॉय ऑफ गिव्हिंग आणि आरसीसी नवी मुंबई शेपर्स यांचे सहकार्य लाभले. या अनुषंगाने आयकॉनिक इमारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीवर ‘आता पोलिओ संपवा  (End Polio Now)’, ‘गुड बाय पोलिओ (Goodbye Polio)’, ‘चला, भारताला पोलिओमुक्त करुया  (Let’s Keep India Polio Free)’ असे प्रकाशमान संदेश मुख्यालयाच्या मध्यवर्ती डोमवर प्रसारीत करण्यात आले.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने पोलिओ मुक्तीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत असून १२ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विशेष पोलिओ लसीकरण मोहीम' राबविण्यात आली. या दिवशी ७२१ इतक्या मोठ्या संख्येने पोलिओ बुथ कार्यान्वित करण्यात आले होते. त्यादिवशी ८८,७४८ अपेक्षित लाभार्थ्यांपैकी ८६ टक्के म्हणजे ७६,८१८ बालकांना लसीकरण करण्यात आले. सदर दिवशी लसीकरण न झालेल्या बालकांच्या लसीकरणासाठी १७ ऑक्टोबर पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येऊन ८२६ आरोग्य पथकांनी घरोघरी जाऊन लसीकरण केले. अशाप्रकारे १२ ते १७ ऑक्टोबर कालावधीत ‘नमुंमपा'च्या वतीने उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच एकूण ९२,२४२ बालकांचे पोलीओ लसीकरण करण्यात आले.  

पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी नवी मुंबई महापालिका क्षेत्र पोलिओमुक्त व्हावे दृष्टीने महापालिका नियोजनबध्द पावले उचलत असून जन्मानंतर प्रत्येक मुलाला दिल्या जाणाऱ्या विविध लसींप्रमाणेच पोलिओ लसींचेे २ थेंब मिळावेत याबाबत महापालिका सतर्क आहे. तसेच दिवाळीनिमित्त महापालिका मुख्यालयाची इमारत विविध रंगाने सजलेली असताना त्यामध्ये पोलिओ विषयक जनजागृतीचा गुलाबी रंगही प्रदर्शित करण्यात आला. पोलिओ लसीचे फक्त २ थेंब बालकाच्या आयुष्यात मोठा फरक घडवू शकतात. त्यामुळे बालकांच्या मोठ्या प्रमाणातील लसीकरणाद्वारे पोलिओमुक्त जगाची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करण्यात येत आहेत.  
-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एमआयडीसी निवासीमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर