राज्यात ‘शिवसेना'ची वाढती ताकद
ठाणे : अडीच वर्षांची कारकिर्द म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद देणारे विकासाचे पर्व आहे. अडीच वर्ष दिवस-रात्र काम करुन सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणले. या कामाची पोचपावती म्हणून राज्यभरातून लोक ‘शिवसेना'मध्ये येत आहेत. आता कितीही संकटे आली तरी ‘शिवसेना'ला कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन ‘शिवसेना'चे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे केले.
शिवसेना पक्षाकडून ठाणे मधील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा अडीच वर्षांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा १ मार्च रोजी ‘एकनाथ पर्व' या सांस्कृतिक कार्यक्रमातून मांडण्यात आला. एक सामान्य कार्यकर्ता असलेल्या एकनाथ शिंदे याला महाराष्ट्रात एवढे मोठ पद मिळाले, मानसन्मान मिळाला; पण काही विघ्नसंतोषी लोकांना ते पचले नाही. त्यांना ध्यानीमनी एकनाथ शिंदेची आठवण येते, असा टोला यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ‘शिवसेना ठाकरे पक्ष'ला लगावला. एकनाथ शिंदे चार भिंतीत रमणारा नाही तर लोकांच्या सेवेत रमणारा आहे. कितीही टीका केली तरी यापुढे काम करत राहणार, असे ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. शासन आपल्या दारी या उपक्रमातून आपण अडीच वर्षात ते करुन दाखवले. जे बोललो ते करुन दाखवले. अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात रोख रक्कम जमा केली. कोट्यवधी बहिणींचा लाडका भाऊ मिळालेली ओळख सर्व पदांपेक्षा मोठी आहे. लाडकी बहिणी योजना कधीच बंद होणार नाही, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला
‘महाविकास आघाडी'च्या काळात राज्य पिछाडीवर होते. मात्र, आपण उठाव केला आणि जनतेच्या मनातले सरकार आणले. मुख्यमंत्री म्हणून काम करताना अडीच वर्षात मागच्या अडीच वर्षांची कमतरता भरुन काढलीच; शिवाय पुढील १० वर्षांची पायाभरणी केल्याची जनभावना आहे, असे ते म्हणाले. अडीच वर्षात ‘शिवसेना'मध्ये राज्यभरातून विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रवेश करीत आहेत. ‘शिवसेना'ची ताकद वाढत असून पक्ष आणखी मजबूत झाली आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निगाहों मे मंजिल थी, गिरे और गिरकर संभलते रहे, हवाओं ने बहोत कोशिश की, मगर चिराग आंधीयों मे भी चलता रहा शेर बोलून दाखवला. त्यामुळे आता कितीही संकटे आली तरीही एकनाथ शिंदे आणि ‘शिवसेना'ला कोणी रोखू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘ठाणे'चे माझ्यावर आणि माझे ठाणेकरांवर प्रेम कायम...
‘ठाणे'मध्ये आपण वाढलो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या सानिध्यात कार्यकर्ता म्हणून घडलो. आता ठाणे बदलत आहे. अनेक मोठे प्रकल्प ‘ठाणे'मध्ये साकारले जात आहेत. ‘ठाणे'चे माझ्यावर आणि माझे ठाणेकरांवर प्रेम कायम आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.