ठराविक पक्षाच्या फायद्यासाठी प्रभाग रचना

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली प्रारूप प्रभाग रचना ठराविक राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी नियम आणि निकष डावलून बनवण्यात आल्याचा आरोप नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला असून ही प्रभाग रचना बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. 

माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत माजी माजी जिल्हाध्यक्ष  रामचंद्र घरत  यांच्यासह भाजपाच्या शिष्टमंडळाने महापालिकेकडे हरकती आणि सूचना नोंदवून नियमानुसार प्रभाग रचना बदलण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाने विहित केलेले निकष डावलून भाजपाला नुकसान होईल या दृष्टीने प्रभाग फोडण्यात आले आहेत, तर दुसरीकडे ठराविक पक्षाचे नगरसेवक सुरक्षित राहतील आणि त्यांना फायदा होईल अशा पद्धतीची प्रभाग रचना हेतू पुरस्सर  करण्यात आली आहे. लोकसंख्येचे आणि भौगोलिक सीमांचे निकष डावलण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रारूप प्रभाग रचनेचा तांत्रिक आणि खोलवर अभ्यास करून नियमानुसार निष्पक्ष प्रभाग रचना सादर करण्यात आली आहे. माजी महापौर नाईक यांनी गॅरी मांडरिंग या संकल्पनेचा उल्लेख करून एखाद्या पक्षाला थेट फायदा पोहोचवण्यासाठी अशा प्रकारची प्रभाग रचना करण्यात आल्याचे सांगितले. प्रभाग रचना करणाऱ्यांच्या क्षमतेबद्दलच शंका येत असल्याची टीका त्यांनी केली. आम्ही सदोष प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना दाखल केल्या असून जर ही सदोष प्रभाग रचना बदलली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा नाईक यांनी दिला.

तर नवी मुंबई मध्ये प्रथमच पॅनल पद्धत लागू केल्याने प्रभाग रचना पारदर्शक आणि निष्पक्ष करण्याची मागणी माजी खासदार नाईक यांनी केली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ईद निमित्त मुंब्रा येथे मानवी साखळी