भिवंडी-वाडा महामार्गाची दुरवस्था
भिवंडी : भिवंडी-वाडा महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. ज्यामुळे प्रवाशांसह चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या महामार्गावर २००९ पासून ‘पीडब्ल्यूडी'च्या वतीने कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, तरीही रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासी आपला जीव मुठीत धरुन या महामार्गावरुन प्रवास करीत आहेत. ज्याकडे ‘पीडब्ल्यूडी'चे दुर्लक्ष झाले आहे.
सदर महामार्गावर आतापर्यंत वेगवेगळ्या अपघातात ५०० हून अधिक जणांचा बळी गेला असून शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग ६४ कि.मी.चा असून सुरुवातीला सुप्रीम इन्फ्रा कंपनीच्या वतीने २००९ मध्ये ३९२.४६ कोटी रुपये खर्च करण्यात आला होते. २०१९ मध्ये सुप्रीम इन्फ्रा कंपनीकडून सदर रस्ता काढून तो ‘पीडब्ल्यूडी'कडे वर्ग करण्यात आला. तेव्हापासून या महामार्गावर टप्प्याटप्प्याने रस्ता दुरुस्तीसाठी तब्बल ३७० कोटी रुपये खर्च करण्यात आले असून या रस्त्याची अवस्था जैसे थे आहे.
या रस्त्यावर दुरुस्तीसाठी शासनाने पुन्हा ७० कोटी रुपये मंजूर करुन जिजाऊ कंट्रक्शन आणि मयूर कंट्रक्शन यांना ठेका दिला आहे. याव्यतिरिक्त सुमारे ११०० कोटी रुपये भिवंडी-वाडा-मनोर रस्ता काँक्रिटीकरणसाठी मंजूर करण्यात आले असून ईगल इन्फ्रा प्रा.लि. कंपनीला आता टेंडर देण्यात आला असून १५ ऑक्टोबर २०२४ ते १३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत काँक्रीट करण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे.
२० जून रोजी सकाळी या मार्गावर कोळशाने भरलेला ट्रक उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जायला आणि चाकरमान्यांना कामावर जायला उशीर झाला. या रस्त्याचे दुरुस्ती काम करणाऱ्या जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीचे निलेश सांबरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला असल्याने केवळ राजकीय पाठरखीमुळे त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, असा आरोप ‘श्रमजीवी संघटना'चे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी केला आहे.