आंतरराष्ट्रीय हायड्रो गांजा तस्करी प्रकरणात चिंचकरचा भाऊ गजाआड
नवी मुंबई: अंमली पदार्थ विरोधी पथकाने मलेशियातून भारतात आणलेल्या ड्रग तस्कर नवीन चिंचकर याचा भाऊ, धीरज चिंचकर याला देखील गुरुवारी रात्री अटक केले. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. आंतरराष्ट्रीय हायड्रो गांजा तस्करी प्रकरणातील आजपर्यंत अटक झालेल्या आरोपींमध्ये दोन पोलिस, कस्टम अधिकारी, दोन आंगडीयांसह एकूण २४ जणांचा समावेश आहे. पोलिसांनी यापूर्वीच न्यायालयात या प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या कारवाईत एकूण ३ कोटींचा हायड्रो गांजा जप्त करण्यात आला आहे.
नेरुळमध्ये सुरुवात, थायलंड-मुंबई मार्गे हायड्रो गांजाची तस्करी...
१४ एप्रिल रोजी नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने नेरुळ, सेक्टर-१५ येथील घरावर छापा मारला होता. त्यावेळी आशिष गवारे आणि अहमद ऑलगी या दोघांना हायड्रो गांजाची डील करताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून १७.१९ ग्रॅम वजनाचा, सुमारे दीड लाख रुपये किंमतीचा हायड्रो गांजा जप्त केला होता. चौकशीतून सदर प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवरील तस्करीशी जोडलेले गेल्याचे समोर आले. गुन्हेगार सुजित बंगेरा आणि साहिल लांब त्यांच्या साथीदारांच्या मदतीने थायलंड मधून एअर कुरिअरमार्गे इम्पोर्टेड गांजा भारतात मागवत होते. सदर माल मुंबई विमानतळावर आल्यानंतर कस्टम अधीक्षक प्रशांत गौर याच्या मदतीने आरोपी कमल चांदवानी उर्फ के. के. सदर माल सोडवत होता. त्यानंतर तो नवी मुंबई परिसरात विक्रीसाठी पोहोचवला जात होता.
पोलीस, कस्टम अधिकाऱ्यांचा सहभाग...
या प्रकरणात खारघर पोलीस ठाण्यातील हवालदार सचिन भालेराव आणि अंमली पदार्थ विरोधी कक्षातील संजय फुलकर आरोपी कमल चांदवानी याच्या संपर्कात असल्याचे तपासात आढळून आले. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांनाही या प्रकरणात अटक केली. तसेच या तस्करीत कस्टम अधीक्षक प्रशांत गौर याचा थेट सहभाग असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला देखील अटक केली आहे. या प्रकरणात आरोपींकडून मिळालेली रोख रक्कम युएसडीटीच्या (क्रिपटो करन्सी) माध्यमातून परदेशात पाठविणाऱ्या अंकित पितांबरभाई पटेल आणि रिकुंदकुमार दिनेशभाई पटेल या दोन आंगडीयांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.
अखेर धिरज चिंचकरला अटक...
तपासात थायलंड आणि अमेरिका येथून गांजा पुरवठा करणारा मुख्य सूत्रधार नवीन चिंचकर असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला जुलै महिन्यात मलेशियातून भारतात आणण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. नवीन चिंचकरला मदत करणारा त्याचा भाऊ धीरज चिंचकर थायलंडमध्ये ड्रग नेटवर्क चालवण्यात सहभागी असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यालाही मलेशियातून भारतात आणल्यानंतर २१ ऑगस्ट रोजी रात्री त्याला देखील अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी दिली. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचेही निगडे यांनी सांगितले.