४ वर्षाच्या विद्यार्थ्यावर बस चालकाकडून लैंगिक अत्याचार

मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकांची भेट; सोमवारी पालकांचा शाळेबाहेर भव्य मोर्चा

नवी मुंबई : सीवूडस येथील शाळेत शिकणाऱ्या ४ वर्षाच्या विद्यार्थ्यावर शाळेच्या स्कूल बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बस चालकावर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकाराबाबत काल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून शाळा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. सदर घटनेबाबत आज सकाळी शाळेच्या गेटबाहेर शाळा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने एकवटले होते. मात्र पालकांना शाळेने यावेळी आतमध्ये प्रवेश नाकारला. शाळेच्या गेट बाहेर उन्हात उभे राहिलेल्या पालकांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन भेट घेतली. यावेळी पालकांनी शाळेचे मुख्याध्यापक व शाळा प्रशासन यांच्या बाबत अनेक तक्रारींचा पाढा वाचला. 

सदर लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालक वर्गात भीतीचे वातावरण असल्याचे पालकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी या ठिकाणी आलेल्या पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून पालक व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर घटनेबाबत पोलिसांचा तपास कोणत्या पद्धतीने व कोणत्या दिशेने सुरु आहे याची माहिती जाणून घेतली. या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवणारे व पालकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणारे शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा तितकेच जबाबदार असून त्यांना याप्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी देखील यावेळी पालक व मनसे पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांकडे करण्यात आली. याप्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण विद्यार्थी सेना पूर्णपणे विद्यार्थी व पालक यांच्या सोबत असेल असा विश्वास मनसेकडून पालकांना यावेळी देण्यात आला. तसेच शाळा प्रशासना विरुद्ध २८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पालकांतर्फे भव्य मोर्चा आयोजित केला आहे. 

मुख्याध्यापक यांचे निलंबन करण्यात यावे. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे मोठ्या प्रमाणात बसवण्यात यावे. बस कंत्राटदारावर गुन्हा नोंदवून कंत्राट रद्द करण्यात यावे. अशा मागण्या मोर्चा मध्ये करण्यात येणार आहेत. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, मनसे नवी मुंबई शहर सचिव सचिन कदम, मनसे विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष योगेश शेटे, उपशहर अध्यक्ष प्रतिक खेडकर, शहर सहसचिव मधुर कोळी, शहर सहसचिव विपुल पाटील, विभाग अध्यक्ष अनिरुद्ध मेंगडे उपस्थित होते.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

एलईडी मासेमारीः २ बोटींवर कारवाई