ठाणे मध्ये ‘मालमत्ता सर्वेक्षण'ला सुरुवात

ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांच्या सर्वेक्षणास सुरूवात

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पर्यावरणपूरक आणि दर्जेदार विकासांच्या कामांचे नियोजन करण्यासाठी तसेच धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी, महापालिका क्षेत्राची भौगोलिक, सामाजिक आणि इतर अद्ययावत माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षण होत असून त्यास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

महापालिका क्षेत्रात शासनाच्या तसेच महापालिकेच्या विविध योजना त्याचप्रमाणे महत्वाकांक्षी प्रकल्प राबवित असताना ठाणेकरांचे योगदान आणि सहकार्य कायम लाभले आहे. त्याबद्दल ठाणेकरांचे आभार. नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी तसेच महापालिका कडून देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांचे प्रभावी नियोजन करणायासाठी महापालिका प्रशासन सतत प्रयत्नशील आणि कटीबध्द आहे. त्यादृष्टीनेच मालमत्ता सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.

‘सर्वेक्षण'मध्ये याचा समावेश...

ठाणे महापालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी ड्रोन आणि तत्सम तंत्रज्ञान वापरुन जीआयएस सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणा दरम्यान सर्व मालमत्तांचे जिओ सिक्वेसिंग (विशिष्ट पध्दतीने क्रमांक देणे) आणि जिओ रेफरन्सिंग (मालमत्तेचे लोकेशन नकाशावर नमूद करणे) करण्यात येणार आहे. सर्व मालमत्तांचे अंतर्गत मोजमाप देखील घेण्यात येणार आहे.

‘सर्वेक्षण'चा उपयोग...

या ‘सर्वेक्षण'मुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्तेच्या क्षेत्रफळाच्या अनुषंगाने मालमत्ता कराची आकारणी होत असल्याची खात्री करता येईल. मालमत्तेच्या दर्शनी भागावर क्युआर कोड असणारी पाटी बसविण्यात येणार आहे. त्यातून महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधाबाबत तसेच राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती ई-प्रणालीतून नागरिकांना उपलब्ध होणार आहे. ‘सर्वेक्षण'मधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने मालमत्ता कराच्या देयकावर बांधकाम परवानगी तपशील, क्षेत्रफळ, वापर, इमारतीचा फोटो आणि मालमत्तेचा अंतर्गत नकाशा उपलब्ध होईल. मालमत्ता कराचे देयक ई-प्रणालीच्या माध्यमातून मालमत्ताधारांना उपलब्ध करुन देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

सर्वेक्षण करणारी संस्था...

ठाणे महापालिकेसाठी सर्वेक्षण मे. स्थापत्य कन्सल्टंटस्‌, पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यांचे अधिकृत प्रतिनिधी (गणवेश, ओळखपत्रासह) तंत्रज्ञानासह ‘सर्वेक्षण'साठी सर्व मालमत्तांना भेट देणार आहेत. या प्रतिनिधींनी विनंती केलेली माहिती आणि संलग्न कागदपत्रे देऊन तसेच मालमत्तेचे अंतर्गत मोजमाप घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे.

शंका, सूचनांसाठी ई-मेल...

या सर्वेक्षण दरम्यान मालमत्तेची आणि नागरिकांची सुरक्षितता यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे या ‘सर्वेक्षण'बाबत नागरिकांना काही शंका असल्यास अथवा काही सूचना असल्यास त्यांनी [email protected] या ई-मेलवर त्या पाठवाव्यात, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दशकभर रखडलेला सानपाडा-तुर्भे पादचारी पूल अखेर पादचाऱ्यांसाठी खुला