बदलापूर-वांगणी दरम्यान रेल्वे रुळाला तडा
अंबरनाथ : ‘मध्य रेल्वे'च्या बदलापूर-वांगणी दरम्यान गोरेगाव जवळ डाऊन लाईन मार्गावर रेल्वे रुळ तडकल्याने ३० जुलै रोजी सकाळी ८च्या सुमारास दोन्ही दिशेकडील लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळाचे काम युध्दपातळीवर करुन अर्ध्या तासानंतर सेवा सुरळीत केली. मात्र, अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
३० जुलै रोजी सकाळी ८च्या सुमारास बदलापूर ते वांगणी दरम्यान रेल्वे रुळावर तडा गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर बदलापूर येथून सुटणारी ८ वाजून ११ मिनिटांची लोकल पुढे जाऊन थांबल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून अर्धा तासात तातडीने रुळ दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर खोळंबलेली कर्जत लोकल वांगणीकडे रवाना करण्यात आली. यामुळे कर्जत आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा उशिराचा फटका बसला. तसेच लांब पल्ल्याच्या एवस्प्रेस मधील प्रवाशांनाही या ठप्प सेवेचा फटका बसला. सकाळी ९.०१५ वाजता कर्जतहून निघालेली सिंहगड एक्सप्रेस सर्व स्थानकांमध्ये थांबवण्यात आली. त्यानंतर १० मिनिटांनी कर्जत येथून पहिली लोकल मुंबईकडे रवाना करण्यात आली.
दरम्यान, कर्जत, नेरळ, माथेरान परिसरातून मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी कामधंद्यानिमित्त मुंबईकडे ये-जा करीत असतात. मात्र, ऐन सकाळच्या वेळी अर्धा तास रेल्वे सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.