सुविधा उपलब्ध करा; अन्यथा रुग्णालयाला टाळे
मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव
डोंबिवली : डोंबिवली मधील कल्याण-डोंबिवली महापालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय नेहमीच वादात असते. काही महिन्यापूर्वी महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. त्यावेळी नातेवाईक प्रचंड संतापले होते. मात्र, एवढे होऊनही गर्भवती महिलांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. अनेक वर्ष या शासकीय रुग्णालयात असाच प्रकार सुरु आहे. १५ एप्रिल रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'च्या पदाधिकाऱ्यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात जाऊन थेट मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश चौधरी यांना घेराव घेतला. दरम्यान, रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन द्या; अन्यथा १५ दिवसांनी शास्त्रीनगर रुग्णालयाला टाळे ठोकणार, असा इशारा यावेळी ‘मनसे'च्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दिला.
रुग्णसुविधा कायमच अपुरी, गर्भवती महिलांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला, रुग्णालयात औषध नसल्याचे सांगत रुग्णालयातील डॉक्टरांकडून समोरील मेडिकल मधून औषधे घेण्यास सांगणे, रुग्णवाहिकेकरितता पैसे घेणे असे प्रकार घडत असल्याचा आरोप ‘मनसे'ने केला.
रुग्णांना सुविधाच मिळत नसेल तर कशाला रुग्णालय सुरु ठेवता. रुग्णालयात फक्त २ लिपीक ठेवा, असे ‘मनसे'चे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. रुग्णालय औषधे उपलब्ध असताना डॉक्टर्स समोरील २ मेडिकल दुकानातील औषधे देत असल्याचा आरोपही ‘मनसे'ने केला. याबाबत मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.दीपा शुक्ल यांनी यावर रुग्णालय औषधे उपलब्ध आहेत. रुग्णांना उपचार मिळावे आणि रुग्ण लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून डॉक्टर्स प्रयत्न करतात, असे स्पष्टीकरण दिले.
या आंदोलनाप्रसंगी ‘मनसे'च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपिका पेडणेकर, कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, माजी नगरसेवक सुदेश चूडनाईक, माजी नगरसेविका कोमल पाटील, अरुण जाभंळे, संदीप (रमा) म्हात्रे, प्रेम पाटील, सुमेधा थत्ते, नंदकुमार भोसले, राजू पाटील, श्रीकांत वारंगे, स्मिता भणगे, चेतन म्हात्रे, रितेश म्हात्रे, अश्विन ब्रम्हा पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते.
हजेरी रजिस्टरवर पुढील ५ दिवसांची हजेरी...
‘केडीएमसी'च्या शास्त्रीनगर रुग्णालयात एका डॉक्टराने पुढील पाच दिवस म्हणजे २० एप्रिल पर्यंत हजेरी रजिस्टरवर सह्या केल्याचे दिसल्यावर ‘मनसे'ने याबाबत जाब विचारला. आधीच डॉक्टरांची कमतरता त्यात कामावर हजर असल्याचे दाखविण्याकरिता असे प्रकार सुरु असल्याचा आरोप देखील ‘मनसे'ने केला.
समोरील २ मेडिकलमध्ये मिळतील अशा औषधांची मागणी...
वास्तविक शासकीय रुग्णालयात औषधे उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, डोंबिवली मधील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात औषधे का मिळत नाही? रुग्णांना समोरील २ मेडिकल मधूनच मिळणारी औषधे का लिहून दिली? जातात असा सवालही ‘मनसे'ने यावेळी उपस्थित केला.